वेस्ट इंडीज येथे रविवारी (१५ जानेवारी) सुरू झालेल्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात (U19 Cricket World Cup 2022) भारतीय संघाने विजयी सलामी दिली. यश धूलच्या (Yash Dhull) नेतृत्वातील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ४५ धावांनी लोळवत आपण ‘फेवरेट्स’ म्हणूनच स्पर्धेत आल्याचे दाखवून दिले. स्वत: कर्णधार यशने संघाला संकटातून बाहेर काढताना ८२ धावांची लाजवाब खेळी केली. फलंदाजांनी केवळ २३२ धावा केल्या असतानाही गोलंदाजांनी हार न मानता भारताच्या विजयाच्या विजयाची गुढी उभारली. भारताच्या या विजयाचा नायक ठरला महाराष्ट्राचा सुपुत्र विकी ओस्तवाल (Vicky Ostwal). महाराष्ट्राच्या मातीतून उजवलेल्या या नव्या सिताऱ्याचा प्रवास आपण जाणून घेऊया. (Story Of Emerging Indian Cricketer Vicky Ostwal)
लोणावळा ते थेरगाव
संपूर्ण महाराष्ट्राचे सुट्टी घालवण्याचे आवडते ठिकाण म्हणजे लोणावळा. हाच लोणवळा विकीचे जन्मगाव. सा-या भारतातील लहान मुलांप्रमाणे विकी देखील असाच हौस म्हणून क्रिकेट खेळायचा. मात्र, मुलांमधील टॅलेंट ओळखून वडिलांनी त्याला क्रिकेटर बनविण्याचे ठरविले. सुरुवातीला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वेंगसरकर अकादमीमध्ये क्रिकेटचे गिरवण्यासाठी वडिल विकीला घेऊन मुंबईला गेले. परंतु, एका वर्षाच्या आत त्यांनी उलट्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली. म्हणजेच, मुंबईला न जाता ते वेंगसरकर अकादमीच्या पुण्यातील थेरगाव येथील अकादमीत त्याला घेऊन येऊ लागले. विकी आणि त्याचे बाबा रोज लोकल ट्रेनने प्रवास करत लोणावळ्याहून पुण्यात येत.
विकीचे प्रशिक्षक मोहन जाधव हे या प्रवासाबद्दल सांगताना म्हणतात,
“त्याचे वडील आणि त्याने तीन-चार वर्षे लोकल ट्रेनने प्रवास केला. त्याला शाळेतून लवकर सोडावे, यासाठी त्याच्या वडिलांनी विशेष परवानगी काढली होती. शाळा सुटल्यावर लोणावळ्याहून लोकल ट्रेनने ते चिंचवडला यायचे. त्यांचा किमान दीड तास प्रवासात जायचा. असा एकूण ते रोज तीन तास प्रवास करायचे. आम्ही त्यांना हा वेळ वाचावा व विकीला सरावासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून पुण्यात स्थायिक होण्याविषयी विचारले. त्यांनी हा निर्णय मान्य करत आपले बस्तान पुण्यात बसविले.”
डाव्या हाताचा फिरकीपटू असलेला उंचपुरा विकी गरज पडल्यास फलंदाजी करू शकतो. गतवर्षाच्या अखेरीस युएई येथे झालेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या आशिया चषकातही त्याची कामगिरी उत्कृष्ट अशी होती. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने तीन बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिलेले. अष्टपैलू कौशल तांबे व राजवर्धन हंगारगेकर यांच्यासह तो महाराष्ट्राचा तिसरा खेळाडू आहे जो या विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करतोय.
आपल्या पहिल्याच सामन्यात पाच बळी मिळवत विकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची अशीच कामगिरी कायम राहिल्यास जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलची दारे त्याच्यासाठी खुली होतील. विकीने आपल्या कामगिरीचा आलेख असाच चढता ठेवल्यास लोणावळ्याच्या चिक्कीसोबत लोणावळ्याचा विकी ही ‘वर्ल्ड फेमस’ व्हायला वेळ लागणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल संघांची उडाली झोप; ‘हे’ प्रमुख इंग्लिश खेळाडू नसणार मेगा लिलावाचा भाग (mahasports.in)
नेतृत्व सोडल्याचा ‘या’ पाच भारतीय कर्णधारांना झालेला फायदा; विराटसोबत असे घडणार? (mahasports.in)