आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही असे खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या सर्वांगसुंदर खेळाने क्रिकेटविश्वात आपले नाव कायमचे कोरले. डॉन ब्रॅडमन ते विराट कोहली हे फलंदाज, सर ऍलेक बेडसरपासून जोफ्रा आर्चर पर्यंतचे गोलंदाज या सर्वांनी क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या रेलचेलीत यष्टीरक्षक हा क्रिकेटमध्ये कायम दुर्लक्षित राहिलेला होता. ज्या काही मोजक्या क्रिकेटपटूंनी यष्टीरक्षकाला एक मान मिळवून दिला, त्या यष्टीक्षकांपैकी एक म्हणजे श्रीलंकेचा सर्वकालीन महान यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा.
२७ ऑक्टोबर १९७७ रोजी श्रीलंकेतील मटाले याठिकाणी कुमार संगकारा याचा जन्म झाला. त्याचे वडील श्रीलंकेतील एक निष्णात वकील होते. संगकाराचे शालेय शिक्षण कॅंडी येथील ट्रिनिटी कॉलेज येथे झाले. त्याचे भाऊ आणि बहीण यांनी लहान वयात श्रीलंकेतील अतिशय मानाचे शालेय विद्यार्थ्यांचे पुरस्कार जिंकले होते. कुमार त्यांच्यासारखाच हुशार होता. शाळेतील विद्यार्थ्यांचा तो प्रमुख होता. कुमार हा अष्टपैलू विद्यार्थी होता. क्रिकेट सोबत टेनिस, जलतरण, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या खेळात तो पारंगत होता.
कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याने देखील आपल्या वडिलांप्रमाणे वकिलीचा अभ्यास सुरू केला. ट्रिनिटी कॉलेजचे प्राचार्य लिओनार्ड द आल्वीस त्यांनी त्याच्यातील क्रिकेट खेळाची गुणवत्ता हेरली. कुमारच्या पालकांना तो उत्तम क्रिकेटर आहे असे सांगितले. त्याचसोबत, त्याने क्रिकेटवर लक्ष द्यावे हेदेखील सुचवले.
संगकाराने क्रिकेटवर आपले लक्ष केंद्रित केले. अनेक आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, स्थानिक स्पर्धा यातून त्याने मोठे नाव कमावले. त्याच्या या कामगिरीच्या बदल्यात त्याला १९९८-९९ च्या दौऱ्यावर श्रीलंका अ संघाकडून पाठविण्यात आले.
पुढील वर्षी त्याने ५ जुलै २००० मध्ये पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय सामन्यात, तर २० जुलै २००० ला दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. तेव्हापासून सुरू झालेल्या या संस्मरणीय कारकिर्दीची अखेर ऑगस्ट २०१५ ला झाली.
यादरम्यान, कुमार संगकाराने असंख्य विक्रम आपल्या नावे केले. माहेला जयवर्धने सोबत २००६ मध्ये कोलंबो येथे द. आफ्रिकेविरुद्ध केलेल्या ६३४ धावांच्या भागीदारीचा विश्वविक्रम आजतागायत कायम आहे. संगकारा श्रीलंकेसाठी कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू आहे. त्याने १३४ कसोटी सामन्यात १२,४०० तर ४०४ एकदिवसीय सामन्यात १४,२३४ धावा काढल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८०००, ९०००, ११००० व १२००० धावा काढणारा तो फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये संगकाराने तब्बल ११ द्विशतके झळकावली. जी फक्त सर डॉन ब्रॅडमन ( १२ ) यांच्या पेक्षा एकने कमी आहेत.
फलंदाजीतील या देखण्या कामगिरीसोबत यष्टीरक्षणात देखील त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. श्रीलंकेसाठी कसोटी, वनडे आणि टी२० मध्ये त्याने अनुक्रमे १८२,४०२ व २५ झेल घेतले. विश्वचषकात ५४ यष्टीचीत करण्याचा विश्वविक्रम संगकाराच्या नावे आहे.
जवळपास दीड दशक श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघाचा आधारस्तंभ बनून राहिलेल्या कुमार संगकाराने वैयक्तिक विक्रमांसोबत संघासाठी ही उपयुक्त कामगिरी केली. २००२ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघात त्याचा समावेश होता. २००७ क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्याने संघाच्या प्रतिनिधित्व केले. मायदेशात झालेल्या २०११ च्या विश्वचषकात श्रीलंकेचे नेतृत्व करताना त्याने संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. २००९ व २०१२ च्या टी२० विश्वचषकाच्या उपविजेत्या संघांतदेखील तो श्रीलंकेचा प्रमुख खेळाडू म्हणून खेळला.
बांगलादेशमध्ये २०१४ साली झालेल्या टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा तो सदस्य होता. अंतिम सामन्यात भारताविरुद्ध ३५ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी करत, त्याने सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला. माहेला जयवर्धनेसोबत अनेक वर्ष श्रीलंका क्रिकेट संभाळल्यानंतर त्यांच्या नावे हे पहिलेच मोठे विजेतेपद होते.
आपल्या कारकीर्दीत संगकाराने अनेक मानाचे पुरस्कार आपल्या नावे केले. यामध्ये २०१२ सालचे आयसीसीचा वर्षातील सर्वात्तम क्रिकेटर व सर्वोत्तम कसोटी क्रिकेटर, तसेच २०११ व २०१३ मध्ये सर्वोत्तम वनडे क्रिकेटर हे पुरस्कार त्याने पटकवले. २०११ व २०१२ चे पीपल चॉईस अवॉर्ड हे आयसीसीचे पुरस्कार ही त्याच्या नावे आहेत.
साल २०११ मध्ये संगकाराला एमसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेटने लॉर्ड्स मैदानावर व्याख्यानासाठी निमंत्रित केले. अशी संधी मिळालेला तो सर्वात तरुण आणि पहिला सक्रिय क्रिकेटपटू होता.
अगदी आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस, २०१५ सालच्या विश्वचषकात सलग चार सामन्यात चार शतके झळकाविण्याचा विश्वविक्रम देखील त्याने आपल्या नावे केला. २०१५ मध्ये भारताविरुद्ध आपली अखेरची कसोटी खेळत क्रिकेटला रामराम ठोकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सरे संघासाठी खेळताना सलग पाच सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम त्याने केला.
निवृत्तीनंतर, तो एमसीसी सोबत जोडला गेला. जवळपास वीस वर्ष ज्याच्यासमवेत मैदानावर काळ व्यतीत केला, अशा माहेला जयवर्धनेसोबत त्याने व्यवसायिक क्षेत्रातदेखील पदार्पण केले. संगकारा मोठ्या प्रमाणात समाजकार्य करतानाही दिसून येतो. युनीसेफसोबत मिळून एड्स जनजागृती कार्यक्रम व माजी संघसहकारी मुरलीधरनसमवेत ” फाऊंडेशन ऑफ गुडनेस ” साठी कार्य करतो.
अंमली पदार्थ जनजागृती मोहिमेचा तो श्रीलंकेतील प्रमुख आहे. त्याच्या निवृत्तीनंतर त्याला श्रीलंका सरकारने लगेच इंग्लंडमध्ये राजदूत बनण्याची शिफारस देखील केली होती.
वाचा –
कमी पण तितकेच समर्पक शब्द, मोहम्मद शमीवर पातळी सोडून टीका करणाऱ्यांना बीसीसीआयने सुनावलं
“रिमेंबर द नेम, कार्लोस ब्राथवेट” या ऐतिहासिक शब्दांचे जनक इयान बिशप्स