23 डिसेंबर 2004, भारत आणि बांगलादेश सामन्यात एका लांब केसाच्या यष्टीरक्षकाने भारतासाठी पदार्पण केले, त्याचे नाव महेंद्रसिंग धोनी. जगातील सर्वात मोठा फिनिशर कोण असे विचारले की सर्वप्रथम धोनीचे नाव घेतले जाते. पण, 23 डिसेंबर 2004 रोजी जेव्हा धोनी खेळण्यासाठी आला त्याच्या, दहा महिन्यांपूर्वी असाच एक खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी आपला अखेरचा सामना खेळला होता. ज्याने क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्द पहिल्यांदा आणला होता.
त्या खेळाडूचे नाव मायकल ज्वुइल बेवन. 8 मे 1970 रोजी ऑस्ट्रेलियाच्या बेलकोनमध्ये त्याचा जन्म झाला. 1994 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी बेवनने पदार्पण केले आणि सामना कसा संपवतात हे पूर्ण क्रिकेट जगताला दाखवून दिले.
वॉ बंधू, मार्क टेलर, मायकल स्लेटर, इयान हिली यासारख्या दिग्गजांनंतर सहाव्या क्रमांकावर बेवनला फलंदाजी करायची संधी मिळत. परंतु, त्यातही सर्वोत्तम कामगिरी करत सामना संपवण्याच्या क्षमतेमुळे संघ सहकारी त्याला ‘टर्मिनेटर’ म्हणत.
संघाच्या आघाडीच्या व मधल्या फळीतील फलंदाजांचे सामना बनवून देण्याचे काम असत तर, सामना संपवायची जबाबदारी बेवन व हिली यांच्यावर असत. बेवनने अनेक बनवलेले सामनेच नाहीतर, स्वतः अनेक सामने बनवून ऑस्ट्रेलियाला विजयी केले. 1996 ते 2004 या काळात बेवन ऑस्ट्रेलिया संघाची खरी ताकत होता. तो संघासाठी किती महत्वाचा होता हे त्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
बेवनची वनडे सरासरी 53.58 इतकी जबरदस्त होती. कोणत्याही खेळाडूची सरासरी 50 पेक्षा जास्त असेल, यावरून अंदाज लावता येतो की, तो फलंदाज कितीवेळा नाबाद राहिला असेल. बेवन 196 डावांपैकी 67 सामन्यात नाबाद राहिला. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले.
1996 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे अवघ्या 15 धावांत 4 गडी गमावले होते. तेव्हा, बेवनने 69 धावांची शानदार खेळी खेळत ऑस्ट्रेलियाला 207 धावांपर्यंत पोहोचवले. शेवटी गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियन तो सामना जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.
1997 मध्ये द आफ्रिकेविरुद्ध सेंचुरीयन येथे 284 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे 50 धावात 3 फलंदाज बाद झाले होते. बेवनने 103 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजयी केले.
1999 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत असताना, स्टीव वॉसोबत डाव सावरत ऑस्ट्रेलियाला 213 धावांपर्यंत पोहचवले. पुढे हा सामना टाय झाला आणि ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश करत तो विश्वचषक ही जिंकला.
बेवनने 10 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक सामने ऑस्ट्रेलियाला जिंकून दिले. पण, ज्या एका सामन्याने जगाला दाखवून दिले की सामने कसे संपवतात. त्या सामन्याची कहानी खूप रोचक आहे.
सुरुवातीच्या 10 सामन्यानंतरही बेवनची सरासरी 50 पेक्षा अधिक होती. तरीही, त्याला पाकिस्तान दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया संघातून वगळण्यात आले होते.
बेवनचे नशीब तेव्हा बदलले जेव्हा, त्याने बेन्सन & हेजेस वर्ल्ड सीरिजमध्ये 1996 च्या नववर्षाच्या दिवशी सिडनीच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध ‘ती’ संस्मरणीय खेळी साकारली.
शेन वॉर्न व पॉल राफेल यांच्या गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या 172 धावांत गडगडला. ऑस्ट्रेलियाचा संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला. मायकल स्लेटर, मार्क टेलर, स्टीव वॉ, रिकी पॉंटिंग, स्टुअर्ट लॉ हे प्रमुख फलंदाज झटपट बाद झाले. बेवन सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. शेन ली व इयान हिली यांनी बेवनला साथ देण्यापेक्षा चुकीचे फटके खेळून ते बाद झाले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 7 बाद 74 अशी वाईट झाली होती.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 99 धावांची गरज होती आणि साथीला गोलंदाज शिल्लक होते. बेवनचा जम बसत असतानाच, वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज रॉजर हार्पर याने कॉट ऍण्ड बोल्डचे अपील केले. ज्यात त्याने झेल सोडलेला असतानाही झेल घेतला असे भासवले. बेवन आपल्या जागी अडून राहिला आणि पंचांनी टीव्हीवर पाहिल्यानंतर बेवनच्या बाजूने निर्णय दिला.
'It's Michael Bevan's evening at the Sydney Cricket Ground!'
It's another half-century for Bevo today as he celebrates his 50th birthday! What a guy. pic.twitter.com/W4fFSfwwOT
— cricket.com.au (@cricketcomau) May 8, 2020
बेवनने राफेलला साथीला घेत डाव सावरला. दोघांनी 83 धावांची भागीदारी रचली. जिंकण्यासाठी 15 धावा हव्या असताना राफेल बाद झाला. ऑस्ट्रेलियाला 7 चेंडूत 11 धावांची गरज होती तेव्हा बेवनने चौकार मारत थोडा दबाव कमी केला.
अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर शेन वॉर्न बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर ग्लेन मॅकग्राने 1 धाव काढत बेवनला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर बेवन देखील एकच धावा काढू शकला. चौथा चेंडू मॅकग्राने तटवत पुन्हा एक धाव काढली. दोन चेंडूत 4 धावा हव्या असताना हार्परने पाचवा चेंडू निर्धाव टाकला. संपूर्ण सिडनी क्रिकेट ग्राउंड शांत झाले होते. बेवनने दबावाचा सामना करत अखेरचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून मारत चौकार वसूल केला आणि ऑस्ट्रेलियाला एक अविश्वासनीय विजय मिळवून दिला. बेवन 78 धावांवर नाबाद राहिला.
मायकेल बेवन कसोटी क्रिकेटमध्ये नाव कमवू शकला नाही परंतु वनडेमध्ये तो कायम ऑस्ट्रेलियाचा प्रमुख खेळाडू राहिला. बेवनने तीन विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले. त्यापैकी 1999 व 2003 या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने विजेतेपद मिळवले. बेवनने 232 वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना 6912 धावा जमा केल्या यात त्याची सरासरी 53.58 इतकी अफलातून होती.
बेवनची कारकीर्द जितकी शानदार राहिली तशी त्याच्या कारकीर्दीची अखेर मात्र झाली नाही. 2004 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याला दुखापत झाली व तो संघाबाहेर गेला. त्यानंतर त्याला पुन्हा संघात स्थान मिळाले नाही. आपला अखेरचा सामना खेळल्यानंतर तीन वर्षांनी त्याने 2007 मध्ये निवृत्ती जाहीर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग लेख –
कसोटी, वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीयांची सरत्या वर्षात चमकदार कामगिरी, पाहा बीसीसीआयची खास यादी
भारतीय क्रिकेटसाठी वेडं झालयं जग, गुगल सर्चच्या बाबतीत फीफा विश्वचषकालाही टाकले मागे