भारतीय क्रिकेट संघाने १९३२ मध्ये, क्रिकेटमध्ये प्रवेश केल्यानंतर १९६० पर्यंत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. १९६० नंतर भारतीय संघाने सामने जिंकण्यास सुरवात केली. परंतु, तरीही परदेशात मालिका जिंकणे म्हणजे एक स्वप्न होते. पण नंतर ७० चे दशक आले आणि भारतीय संघाने प्रथमच १९७१ मध्ये वेस्ट इंडीजचा पराभव केला आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव केला.
इथूनच भारतीय क्रिकेटची एक नवीन कहानी सुरू होते. इंग्लंडमध्ये इंग्लंडला हरविणारा भारतीय क्रिकेटचा पहिला कर्णधार अजित वाडेकर. या विजयानंतर जेव्हा १९७४ मध्ये भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला तेव्हा भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या.
परदेशातही भारतीय संघ प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करू शकतो, असं वाटायला लागलं होतं. पण या मालिकेत असे काही घडले की, ज्याने केवळ भारतीय चाहत्यांनाच नव्हे तर भारतीय क्रिकेटला सुद्धा हादरवून टाकले.
१९७४ मध्ये जेव्हा भारत संघ इंग्लंडला पोहोचला आणि…..
एप्रिल १९७४ मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ जगातील अव्वल दर्जाचा संघ होता. पहिल्यांदाच असं घडलं कि, एकाच कर्णधाराच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडमध्ये दुसर्यांदा गेला होता. मँचेस्टर येथे खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ११३ धावांनी पराभूत झाला.
दुसर्या कसोटी सामन्याच्या पूर्वी संघामध्ये वाईट गोष्टींना सुरुवात झाली. संघातील ज्येष्ठ खेळाडू बिशनसिंग बेदी आणि कर्णधार अजित वाडेकर आधीच अडचणीत सापडले होते.
मालिकेपूर्वी इंग्लंडमध्ये एप्रिल-जून महिन्यात इतका पाऊस पडला होता की भारतीय संघाला सरावदेखील करता आला नाही. पावसामुळे वेगवान गोलंदाजांना ओल्या खेळपट्ट्यांचा फायदा होत होता. त्यावेळी भारतीय संघाकडे वेगवान गोलंदाज नव्हते. त्या दौर्यावर भारतीय संघात चार फिरकी गोलंदाज होते.
एवढेच नाही तर, त्यावेळी इंग्लंडमधील एका दुकानातून एक भारतीय खेळाडू सामान चोरी करताना पकडला गेला. त्या खेळाडूला या दौऱ्यात सॉक्स (मोजे) चोरी करताना पकडले गेले होते. याचा मोठा परिणाम भारतीय संघाच्या मनोबलावर झाला.
लॉर्ड्सच्या मैदानावरची दुसरी कसोटी-
दि. २० जून १९७४ पासून दुसर्या कसोटीला सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत इंग्लंडच्या संघाने ६२९ धावांचा डोंगर उभा केला. फक्त लॉर्ड्सवरच नव्हे तर दुसर्या महायुद्धानंतरच्या कसोटीत ही त्यांची सर्वात मोठी धावसंख्या होती. भारतीय संघातील प्रसिद्ध फिरकी त्रिकूट फ्लॉप ठरले होते.
पण तरीही, भारतीय चाहत्यांना आशा होती की फलंदाजी नक्कीच चांगली कामगिरी करेल. कारण संघात गावस्कर, इंजीनियर, वाडेकर, ब्रजेश पटेल, सोलकर, आबिद अली आणि मदन लाल असे मोहरे होते.
१९७१ च्या विजयामुळे हा आत्मविश्वास प्रेक्षकांना होता. पण कसोटीच्या तिसर्या दिवशी भारतीय संघ ३०२ धावांवर बाद झाला. यामुळे इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावाच्या जोरावर ३२७ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवली. तसेच भारतीय संघाला फॉलोऑनही दिला. तिसर्या दिवसाच्या शेवटी भारतीय संघाची धावसंख्या एकही गडी न गमावता २ अशी होती.
तीन दिवसांच्या खेळानंतर विश्रांतीचा दिवस आला. रविवारी भारतीय प्रेक्षकांना आशा होती की चौथ्या दिवशी सकाळी भारतीय संघाची चांगली फलंदाजी होईल. फलंदाजीसाठी विकेट उत्तम असल्यामुळे त्यात चांगले फलंदाज असल्याने चिंता तशी कमी होती. त्याहूनही अधिक की अर्नोल्ड, ओल्ड, ग्रेग, हेंड्रिक आणि अंडरवुड ही इंग्लंडची गोलंदाजीची लाइनअप फारशी शक्तिशाली नव्हती.
दि. २४ जून १९७४-
दि.२४ जून १९७४ रोजी क्रिकेट मैदानावर असा प्रकार घडला, की असा कधी भारतीय संघासोबत कधी घडला नव्हता. सुनील गावस्कर आणि फारूक इंजिनिअर हे डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात उतरले, तर अर्नोल्ड आणि ओल्ड यांनी इंग्लंडकडून गोलंदाजीस सुरुवात केली. परंतु खेळ सुरू झाला आणि ३० मिनिटानंतर ट्रांसिज़टर्सवर इंग्लंड प्रेक्षकांचा आवाज येऊ लागला. इंग्लंडचे प्रेक्षक आनंदाने ओरडत होते.
“भारतीय संघाने अवघ्या २५ धावांवर ५ विकेट गमावल्या आहेत”.
पण हे सर्व कसे घडले. गावसकर, इंजीनियर, वाडेकर, विश्वनाथ, पटेल हे दिग्गज फलंदाज ३० मिनिटांत कसे बाद झाले? हे घडलं तरी कसं. त्यादिवशी, अर्नोल्डच्या गोलंदाजीवर ना गावसकर (५ धावा) बरसले, ना इंजीनियर (० धावा) धाव करू शकले. विश्वनाथ (५ धावा), पटेल (१ धावा), वाडेकर (३ धावा) हे सर्व फक्त मैदानात हजेरी लावून गेले.
यानंतर ओल्डनेही आपला जलवा दाखवत भारतीय फलंदाजी नष्ट केली. २८ धावा असताना आबिद अलीला (३ धावा) धावबाद झाले. त्याच षटकात मदन लाल (२ धावा ) ही पॅव्हेलियनमध्ये परतले. आतापर्यंत ३० धावांच्या मोबदल्यात ही ७ विकेट्स गेल्या होत्या. मात्र एकनाथ सोलकर एका बाजूने किल्ला लढवत राहिले. परंतु ते तरी एकटे काय करणार.
त्यानंतर प्रसन्ना (५ धावा) आणि बेदी (० धावा) एकाच षटकात बाद झाले. आता धावसंख्या ४२ धावांवर ८, ९ असे विकेट्स गेल्या. त्यानंतर चंद्रशेखर फलंदाजीलाही येऊ शकले नाहीत. खरंतर त्याच्या फलंदाजीला आता काहीच अर्थ उरला नव्हता.
त्यादिवशी भारतीय संघाचा डाव अवघ्या ७७ मिनिटांत १७ षटकांतच कोसळला. सोलकर १८ धावा करुन नाबाद राहिले होते आणि भारताला केवळ ४२ धावा करता आल्या होत्या. लॉर्ड्स आणि क्रिकेटच्या कोणत्याही मैदानातील हा भारतीय संघाची सर्वात कमी धावसंख्या होती. शेवटी चौथ्या दिवशी सकाळी इंग्लंडने तो सामना डाव आणि २८५ धावांनी आरामात खिशात घातला होता.
दुसर्या कसोटीतील पराभवामुळे भारताने मालिका गमावली, शिवाय तिसऱ्या कसोटीतही भारताला पराभव पत्करावा लागला. भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वात वाईट कामगिरीबद्दल बोला्यच झालं तर आठवतो तो म्हणजे हा कसोटी सामना.