भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषकानंतर १७ नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची टी२० आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कोरोना निर्बंधांमुळे मागच्या बऱ्याच काळापासून भारतात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही आणि अशात चाहत्यांमध्ये या मालिकेसाठी उत्सुकता दिसत आहे. जे चाहते हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहणार आहेत, त्यांची उत्सुकता एका वेगळ्याच पातळीवर आहे. मालिकेतील पहिला टी२० सामना जयपूरच्या एसएमएस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी कडक बंदोबस्त केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पहिल्या सामन्यादरम्यान खेळाडू आणि स्टेडियमची सुरक्षाव्यवस्था आणि ट्रॅफिकचेही नियोजन करावे लागणार आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंना स्टेडियमपर्यंत आणण्यासाठी आणि स्टेडियममधून हॉटेलपर्यंत घेऊन जाण्यासाठी कडक पोलीस व्यवस्था केली जाणार आहे.
एडिशनल पोलिस आयुक्त हौदर अली जैदी यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या सामन्यासाठी १५०० पोलीस कर्मचारी स्टेडियममध्ये वेगवेगळ्या जागेवर उपस्थित असतील. यामध्ये ३०० जवान आणि ५ आरएसी कंपन्यांचाही सहभाग असेल, असे त्यांनी सांगितले आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेडियमच्या चारही गेटमधून प्रवेश दिला जाणार आहे. यापैकी साउथ गेटमधून खेळाडू आणि महत्वाच्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर त्या गेटवर विशेष बंदोबस्त केला जाणार आहे. सामन्याच्या दिवशी प्रेक्षक मोठ्या संख्येने येणार असल्यामुळे इनवेस्टमेंट मैदान आणि पेरूच्या बागेत गाड्या लावण्याची व्यवस्था केली गेली आहे. तसेच ट्रॅफिक कोंडी होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांवर डायवर्जने केले जाणार आहे. स्टेडियममध्ये प्रवेश देण्यासाठी प्रत्येक गेटवर पोलीस कर्मचारी उपस्थित असतील, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, १७ तारखेला खेळला जाणाऱ्या पहिल्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघातील अनेक खेळाडू जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. न्यूझीलंड संघही विश्वचषकानंतर याठिकाणी दाखल होईल. सामन्याच्या दिवशी कसल्याच प्रकारची गडबड होऊ नये, यासाठी जयपूर पोलिसांकडून अनेकदा सराव केला गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर मिताली राज झाली भावुक; म्हणाली, ‘मनापासून आशा आहे की…’
पाकिस्तान संघाला ८ वर्षाच्या चिमुकल्याने पत्र लिहून मागितले ऑटोग्राफ, बाबर आझमने दिले ‘असे’ उत्तर
नाराज अख्तर आणि ‘त्या’ सूत्रसंचालकाची झाली दिलजमाई; केंद्रीय मंत्र्याने केली मध्यस्थी