पुणे | एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत 16 देशांमधून सहभागी होणार्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह अनेक नामवंत भारतीय खेळाडूंमुळे ही स्पर्धा अतिशय चुरशीची होणार आहे. पुण्यांतील म्हाळुंगे बालेवाडी संकुलात येत्या 13 ते 18 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.
तसेच,या स्पर्धेत अनेक अव्वल मानांकित भारतीय खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून यामध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल 150 खेळाडूंच्या यादीत असलेले डेव्हिस कप स्टार युकी भांब्री(2014मधील विजेता), रामकुमार रामनाथन यांसह साकेत मायनेनी आणि प्रजनेश गुन्नेस्वरण या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
पीएमडीटीएचे अध्यक्ष, संयोजन समितीचे अध्यक्ष आणि केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील म्हणाले की, आम्ही सलग चौथ्या वर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना आपल्या मानांकनात प्रगती करता येते. तसेच टेनिसमधील त्यांची कारर्किद घडविण्यास या स्पर्धेचा उपयोग होतो, याचा मला विशेष आनंद आहे. तसेच, या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय आणि आशियाई खेळाडूंना पुरस्कृत करण्याचे आमचे लक्ष यशस्वी होत असल्याचाही मला आनंद वाटतो.
ते पुढे म्हणाले की, 2014मध्ये ही स्पर्धा जिंकणारा जपानचा युईचा सुगिता याने पुढे जाऊन 2015मध्ये जागतिक क‘मवारीत अव्वल 100खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे आणि सध्या तो जगात 39व्या क्रमांकावर आहे. तसेच, आपल्या युकी भांब्री यानेही ही स्पर्धा जिंकल्यानंतर अव्वल 100खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. गतवर्षीचा उपविजेता प्रजनेश गुन्नेस्वरण यानेही अव्वल 200खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आणि डेव्हिस कप संघातही त्याची निवड झाली. 2016मधील विजेता स्टॅडिओ डंबिया याने अव्वल 125खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. यंदाच्या वर्षीचा विजेताही अव्वल खेळाडूंमध्ये झेप घेईल, असा आम्हांला विश्वास वाटतो.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा जगभरात लोकप्रिय होत चालली असून ही अधिक भव्य आणि दर्जेदार खेळाडूंचा सहभाग यामुळे या स्पर्धेचा स्तर दरवर्षी उंचावत आहे. यंदाचा कट ऑफ 303असा असून त्यामुळे ही स्पर्धा या स्तरावर अतिशय चुरशीची होणार आहे. आम्हांला किमान 8 ते 10 भारतीय खेळाडू मु‘य ड्रॉ आणि पात्रता फेरीत खेळणे अपेक्षित आहे आणि या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंशी घरच्या मैदानावर लढण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
केपीआयटी समुहाशी आमचे नाते अतिशय निकटते असून या आमच्या सहयोगातून खेळाडूंसाठी आश्चर्यजनक गोष्टी घडल्या आहेत. एटीपी व्यवस्थापनाने सुध्दा या स्पर्धेचे अतिशय उत्तम आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून चॅलेंजर स्तरावरील स्पर्धेला प्रथमच थेट प्रक्षेपणाचा मान दिला आहे.
पोर्तुगालचे रॉजिरिओ सांतोस यांची एटीपी सुपरवायझर असणार असून शितल अय्यर यांची मुख्य रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 11 व 12 नोव्हेंबर रोजी होणार असून मुख्य फेरीस 13नोव्हेंबर रोजी होणार आहेत. स्पर्धेचे उपांत्य व दुहेरीचा अंतिम फेरीचा सामना शुक्रवार, दि.17 नोव्हेंबर रोजी होणार असून शनिवार, दि.18 नोव्हेंबर रोजी एकेरीच्या अंतिम फेरीचा सामना होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 7200डॉलर(4,80,000रूपये) व 80एटीपी गुण, तर उपविजेत्याला 4053डॉलर(2,70,000रूपये)व 48 एटीपी गुण देण्यात येणार आहेत. याशिवाय या स्पर्धेबरोबरच विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून जिल्हस्तरीय कुमार टेनिस स्पर्धा, हौशी वरिष्ठ गटातील लीग स्पर्धा, प्रशिक्षक व कॉर्पोरेट टेनिस यांसाठी डेली कॉटेस्ट यांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये कौस्तुभ शहा, जयंत कढे, अश्विन गिरमे, मिहिर दिवेकर, हिमांशु गोसावी, शेखर सोनसाळे, उमेश माने यांचा समावेश आहे.
केपीआयटी एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील विजेतेः
एकेरी गटः
2016ः सादिओ डंबिया(फ्रांस)वि.वि.प्रजनेश गुन्नेस्वरण 4-6, 6-4, 6-3;
2015ः युकी भांब्री(भारत)वि.वि.एव्हेग्नी डॉंस्काय(रशिया)6-2, 7-6(7-4);
2014ः युईची सुगिता(जपान)वि.वि.एड्रियन मेनेडेझ-मॅसिरस(स्पेन)6-7(1-7), 6-4, 6-4;
दुहेरी गटः
2016ः पुरव राजा/दिविज शरण(भारत)वि.वि.लुका मार्गोली/हुगो न्यास(फ्रांस)3-6, 6-3, 11-9;
2015ः गेरार्ड ग्रॅनोलर्स/ऍड्रियन मेनेडेझ-मॅसिरस(स्पेन)वि.वि.मॅक्सिलीअन न्युक्रिस्ट(ऑस्ट्रिया)/दिविज शरण(भारत)1-6, 6-3, 10-6;
2014ः साकेत मायनेनी/सनम सिंग(भारत)वि.वि.सँचाय/सोंचात रतीवत्ना(थायलंड)6-3, 6-2.