गेल्या काही दिवसात अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे. त्यात आता अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीचाही समावेश झाला आहे. त्याने सोमवारी (३० ऑगस्ट) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे.
स्टुअर्ट बिन्नीने निवृत्ती जाहीर करताना म्हटले आहे की ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत बीसीसीआयच्या योगदानाबद्दल मी कृतज्ञ आहे. मला इतक्या वर्षात मिळालेला पाठिंबा आणि विश्वास अमुल्य आहे. मला जर कर्नाटक क्रिकेटचा पाठिंबा नसता, तर माझी क्रिकेट कारकिर्द सुरु झाली नसती. कर्नाटकचे नेतृत्व करणे आणि संघासाठी ट्रॉफी जिंकणे माझ्यासाठी अभिमानास्पद होते.’
याशिवाय स्टुअर्ट बिन्नीने त्याच्या कारकिर्दीत आलेल्या प्रशिक्षकांचे, कर्णधरांंचे आणि निवडकर्ते यांचे देखील आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्याने कुटुंबियांचेही आभार मानले आहेत. तसेच तो म्हणाला की ‘क्रिकेट माझ्या रक्तात आहे आणि मी या खेळाला काही तरी परत देऊ इच्छितो, कारण या खेळाने मला सर्वकाही दिले आहे.’
स्टुअर्ट बिन्नीच्या नावे मोठा विक्रम
बिन्नीने २०१४ साली ढाका येथे बांगलादेशविरुद्ध वनडेत खेळताना ४.४ षटके गोलंदाजी केली होती. त्यात २ षटके निर्धाव टाकून ४ धावांत ६ गडी बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याने बांगलादेशच्या मुशफिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, महमुदुल्ला, नासिर हुसेन, मुशरफी मुर्तझा आणि नासिर हुसेन यांना बाद केले होते.
या दरम्यान तो भारताकडून वनडेत सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा गोलंदाज ठरला होता. यावेळी त्याने कुंबळेचा २१ वर्षांचा विक्रम मोडला होता. कुंबळेने १९९३ ला वेस्ट इंडिजविरुद्ध ६.१ षटकात १२ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. बिन्नीने केलेला हा विक्रम आजही त्याच्याच नावावर आहे.
स्टुअर्ट बिन्नीची कारकिर्द
स्टुअर्ट बिन्नीने भारतीय संघासाठी ६ कसोटी सामने, १४ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले आहेत. बिन्नीने कसोटीत २१.५४ च्या सरासरीने १९४ धावा केल्या आहेत. वनडे सामन्यांत त्याने २८.७५ च्या सरासरीने २३० धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट कारकीर्दीत त्याने १७.५ च्या सरासरीने ३५ धावा केल्या आहेत. तसेच कसोटीत ३, वनडेमध्ये २० आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १ विकेट घेतली आहे.
तसेच त्याने ९५ प्रथम श्रेणी सामने खेळताना ४७९६ धावा केल्या असून १४८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये २०१३-१४ हंगामात सर्वोत्तम प्रदर्शन केले होते. त्याने त्या हंगामात ४४३ धावा आणि १४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच कर्नाटकला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
याशिवाय त्याने १०० अ दर्जाचे सामने खेळताना १७८८ धावा केल्या असून ९९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने एकूण १५० टी-२० सामने खेळले असून १६४१ धावा केल्या आहेत आणि ७३ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल कारकिर्दची सुरुवात त्याने २०१० साली मुंबई इंडियन्सकडून केली. त्यानंतर त्याने राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने आयपीएल कारकिर्दीत ९५ सामने खेळताना ८८० धावा केल्या आणि २२ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात फेरबदल; बटलरची उर्वरित मालिकेतून माघार, तर ‘या’ गोलंदाजांचे पुनरागमन
इतिहास घडला! भारताच्या अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये जिंकले ‘सुवर्णपदक’
‘हा’ खेळाडू भारतीय संघासाठी अडचण, माजी इंग्लिश कर्णधाराने संघाबाहेर करण्याचा दिला सल्ला