मुंबई । अष्टपैलूंची देणगी लाभलेला तसेच चपळ आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या स्टुअर्ट बिन्नीने रणजी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. एक बॉलिंग ऑलराउंडर म्हणून त्याची भारतीय संघात एंट्री झाली. मध्यमगतीने गोलंदाजी करणारा स्टुअर्ट बिन्नीला भारतीय क्रिकेट संघात आपले पाय दीर्घकाळ रोवता आले नाही. त्याला जेव्हा संधी मिळाली त्या संधीचे सोने करत काही विक्रमही आपल्या नावावर केले.
स्टुअर्टने 6 वर्षांपूर्वी म्हणजे 17 जून 2014 साली बांगलादेशविरुद्ध ढाका येथे खेळताना ऐतिहासिक कामगिरी केली. आपल्या भेदक गोलंदाजीने बांगलादेशी अर्धी फळी कापून काढली. अवघ्या 4 धावा देऊन 6 गडी बाद करत त्या सामन्यात तो हिरो ठरला. गोलंदाजीमध्ये भारताकडून केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे. यापूर्वी अनिल कुंबळेने वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना अवघ्या 12 धावात 6 गडी बाद केले होते. स्टुअर्टने या कामगिरीसह अनिल कुंबळेचा विक्रम मोडीत काढला.
सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळताना या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 105 धावांवर भारताचा डाव गडगडला. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक 27 धावा सुरेश रैनाने केल्या. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद याने 28 धावा देत भारताचे 5 गडी बाद करुन एकच खळबळ उडाली होती.
106 धावांचे छोटेसे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाची सुरूवात अत्यंत खराब झाली. मोहित शर्माने बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमीम इक्बाल याला सामन्यातल्या दुसऱयाच चेंडूवर बाद केले. तिसऱ्या षटकात मोहितने इनामुल हक याला देखील मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
खेळपट्टीचे बदलते रंग रूप पाहून बाराव्या षटकात रैनाने स्टुअर्टच्या हाती चेंडू सोपवला. स्टुअर्टने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आपल्या भेदक गोलंदाजीने बांगलादेशच्या फलंदाजांच्या पोटात गोळाच आणला. त्याने मुश्फिकूर रहीम, मिथून आणि महमदुल्ला या तिघांना एकही धाव धाव न देता बाद केले.
त्यानंतर मशरफे मोर्तझा आणि नासिर हुसेन यांना त्रिफळाचीत करून स्टुअर्टने सामन्यातला पाचवा गडी बाद केला. 18 व्या षटकात अल अमीन हुसेन याला देखील बोल्ड करत माघारी धाडले. अखेर बांगलादेशचा डाव 58 धावांवर आटोपला आणि भारतीय संघाने 47 धावांनी विजय मिळवला.
अशी दमदार कामगिरी करूनही स्टुअर्ट बिन्नीला वाढत्या स्पर्धेमुळे भारतीय संघात आपले स्थान भक्कम करता आली नाही. अाता 36 वर्षीय या गोलंदाजाला भारतीय संघात कमबॅक करणे अवघड आहे. तो 2015 पासून संघाबाहेर आहे. आपल्या कारकीर्दीत त्याने भारतीय संघाकडून 6 कसोटी, 14 वनडे आणि 3 टी ट्वेंटी सामने खेळला आहे. कसोटीत 86.0 च्या सरासरीने 3 बळी, वनडेत च्या 21.95 सरासरीने 20 आणि टी ट्वेंटीमध्ये 54.0 च्या सरासरीने 1 बळी टिपला.