नवी दिल्ली:मलेशिया येथे सुरु असलेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला ऑस्टेलियाविरुद्ध १-३ असे पराभवाला सामोरे जावे लागले.
सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेतील हा भारताचा पहिलाच पराभव होता.
अनुभवी श्रीजेशचा तेराव्या मिनिटाला सामन्यातून बाहेर जायचा चांगलाच फटका भारताला बसला. श्रीजेशच्या जागी खेळण्यासाठी आलेल्या आकाश चिकटेच्या पायातून ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी गोल केला. या गोलमुळे ऑस्ट्रेलियाला २-१ अशी आघाडीही मिळाली.
९ वेळा सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या विजेत्या असलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच मिनिटाला स्पर्धेतील गोल करायची संधी मिळाली होती. परंतु ट्रेंट मिटेनला ही संधी साधता आली नाही आणि त्याने पेनल्टी वाया घालवली.
भारत या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरी लढत खेळत होता. भारताचा इंग्लंडविरुद्धचा सामना २-२ असा अनिर्णित राहिला तर न्यूजीलँड विरुद्ध भारताने ३-० असा विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात न्यूजीलँड विरुद्ध १-१ असा सामना बरोबरीत सोडवला तर यजमान मलेशिया विरुद्ध ६-१ असा विजय मिळवला.
भारताच्या आता पुढच्या फेरीत प्रवेश करण्याच्या पूर्ण आशा आता इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर अवलंबून आहे. जर ऑस्ट्रेलियाने यात विजय मिळवला तरच भारताचं आव्हान या स्पर्धेत टिकून राहू शकते.