रोहित शर्मा ते रो’हिट’ शर्मा… इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसानंतर (०४ सप्टेंबर) सर्वत्र रोहित नावाचा गजर सुरू आहे. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत आघाडीच्या दिशेने कूच करण्यासाठी उभय संघ झगडत आहेत. अशात प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या ९९ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना संघाच्या दुसऱ्या डावात सलामीवीर रोहितने १२७ धावांची जबरदस्त खेळी खेळली आहे. कसोटी पदार्पणानंतर परदेशात हे त्याचे पहिलेवहिले शतक आहे. इंग्लंडच्या धरतीवरील या विक्रमी शतकानंतर रोहितच्या एका जुन्या ट्वीटची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये ‘हिटमॅन’ रोहित भारताच्या कसोटी संघाचा कायमचा सदस्य बनला आहे. मात्र यापूर्वी परिस्थिती अशी नव्हती. खराब प्रदर्शन किंवा इतर कारणास्तव सतत कसोटी संघातून त्याला वगळले जात असायचे. जुलै २०१८ मध्ये भारतीय संघाला इंग्लंडचा दौरा करायचा होता. या दौऱ्यावेळी कसोटी संघात जागा न मिळाल्याने निराश असलेल्या रोहितने ट्वीट करत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती.
‘उद्या पुन्हा सूर्य उगवेल’, असे ते ट्वीट होते.
https://twitter.com/ImRo45/status/1019613071621480448?s=20
अर्थातच रोहित अप्रत्यक्षपणे सर्वांना सांगू इच्छित होता की, आज जरी तो संघाबाहेर असला; तरीही एक दिवस तो याच संघाचा अभिन्न भाग बनेल आणि तसे झालेही. या ट्वीटच्या जवळजवळ ३ वर्षांनंतर रोहितची इंग्लंड दौऱ्यावर निवडही झाली आणि त्याने नुकतेच ओव्हलच्या मैदानावर चौथ्या कसोटीत परदेशातील पहिले शतकही झळकावले आहे. त्याच्या या कामगिरीनंतर हे जुने ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
‘तुझा हा कसोटी क्रिकेटमधील उदय सर्वांना पुरुन उरणारा’, असल्याची प्रतिक्रिया एका ट्वीटर वापरकर्त्याने दिली आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1432983677210742786?s=20
चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ केवळ १९१ धावांवर गारद झाला होता. त्यानंतर इंग्लंडच्या ९९ धावांच्या आघाडीला मागे टाकत या फलंदाजीस पोषक मैदानावर त्यांना भक्कम आव्हान देणे भारतीय संघासाठी गरजेचे आहे. अशात रोहितने सलामीला फलंदाजी करताना १२७ धावा चोपत संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. २ वेळा मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत १ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या आहेत.
त्याच्या बरोबरीला चेतेश्वर पुजाराने ६१ धावांची चिवट खेळी केली आहे. तर कर्णधार विराट कोहली नाबाद २२ धावा आणि रविंद्र जडेजा नाबाद ९ धावांवर असून २०० हून अधिक धावांची आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशात चौथ्या दिवशी भारतीय संघ अजून किती धावा फलकावर नोंदवेल? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताची भक्कम भिंत…! पाय मुरगळला, तरीही पट्टी बांधून ‘लढवय्या पुजारा’चे अर्धशतक- Video
कडक षटकार अन् शतकाला गवसणी, रोहितच्या क्लास सेंचूरीनंतर पत्नीची ‘फ्लाइंग किस’; व्हिडिओ व्हायरल
सुरुवातीलाच गेला असता, पण बर्न्समुळे रोहितला दोनदा जीवनदान; इंग्लिश दिग्गजानेच घेतली फिरकी






