क्रिकेट वेड्या देशांत मागील काही वर्षांत फुटबॉलची लोकप्रियता वाढतेय, सामने सुद्धा प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असतात यामागे अनेक कारणं असली तरी त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री. जेवढे यासगळ्याचे श्रेय सुनीलला जाते तेवढे इतर कोणालाही नाही. सुनीलने सोशल मीडियावर प्रेक्षकांना फुटबॉलचे सामने पाहायला मैदानावर या असे आव्हान एक व्हिडिओ टाकत केले आणि तिथून पुढचे फुटबॉलचे सर्व सामने हाऊसफुल्ल झाले यातच त्याची लोकप्रियता समजते. 1950 च्या काळात फुटबॉलचा सुवर्णकाळ पाहिलेल्या भारतीय संघाला नंतरच्या काही काळात प्रत्येक मोठी स्पर्धा खेळण्यासाठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागला होता. अशात गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) सुनील त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने त्याच्या कारकीर्दीविषयी खास गोष्टी जाणून घेऊयात…
सन 2007, 2009 आणि 2012 मध्ये भारतीय संघाने नेहरू कप आपल्या नावे केला. त्यात सुद्धा सुनील छेत्री (Sunil Chhetri) याचे मोठे योगदान होते. तसेच 2008 साली भारतीय संघाने एएफसी चॅलेंज कप जिंकत तब्बल 27 वर्षानंतर एएफसी एशियन कप खेळण्यास पात्रता मिळवली. त्याला चॅलेंज कपचा मोस्ट व्हॅल्युऐबल प्लेअरचा सुद्धा अवॉर्ड देण्यात आला होता. 2011 साली झालेल्या या एशियन कपमध्ये सुद्धा सुनीलने 3 सामन्यात 2 गोल केले होते. 2011 साली भारताने जिंकलेल्या साऊथ आशिया फुटबॉल फेडरेशन मध्ये सुद्धा सुनीलने सर्वाधिक (7) गोल्स केले होते.
सुनीलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011मध्ये इतिहासात तिसऱ्यांदा आशिया कपमध्ये प्रवेश मिळवला होता. आशिया कपच्या पात्रता फेरीत सुनीलने तब्बल 8 गोल करत भारतीय संघाला प्रवेश मिळवून दिला होता. त्यानंतर भारतीय संघाने सुनील छेत्रीच्याच नेतृत्वाखाली 2019मध्ये चौथ्यांदा प्रवेश केला होता. तसेच, कतार येथे होणाऱ्या 2023च्या एशियन कपसाठीही भारतीय फुटबॉल संघ पात्र झाला आहे.
मेस्सी का रोनाल्डो कोण श्रेष्ठ? या वादात जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या गोल्सचा विषय निघतो तेव्हा आज अभिमानाने प्रत्येक भारतीय फुटबॉलचा समर्थक सुनील छेत्रीचे सुद्धा नाव घेतो. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. सद्ध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल्स करणाऱ्यांच्या यादीत सुनील रोनाल्डोनंतर चौथ्या स्थानी येतो. सुनीलने भारतातर्फे 142 सामन्यात 92 गोल्स केले आहेत. तसेच, लिओनेल मेस्सीच्या नावावर 175 सामन्यांमध्ये 103 गोल्स आहेत.
सन 2002मध्ये क्लब फुटबॉल मध्ये मोहन बगान तर्फे पदार्पण करताना सुनील 3 वर्ष तिथे खेळला आणि 2005 साली त्याला जेसीटी संघाने करारबद्ध केले. याच वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आपला पहिला गोल पाकिस्तान विरुद्ध नोंदवला. त्यानंतर तो ईस्ट बंगाल कडून सुद्धा काही काळ खेळला पण त्याला सर्वात मोठी संधी मिळाली ती 2010 साली जेव्हा त्याला अमेरिकेतील मेजर लीग सॉकरचा क्लब कॅन्सस सिटीने करारबद्ध केले. तिथे एक वर्ष खेळल्यानंतर तो परत भारतात आला आणि दोन वर्षाने त्याला पुन्हा एकदा बाहेर खेळण्याची संधी मिळाली जेव्हा त्याला 2012 साली पोर्तुगालच्या स्पोर्टिंग लिस्बन बी संघाने करारबद्ध केले.
𝓐𝓰𝓮𝓲𝓷𝓰 𝓵𝓲𝓴𝓮 𝓯𝓲𝓷𝓮 𝔀𝓲𝓷𝓮! 🍷
Here's wishing @chetrisunil11 a very Happy Birthday! 🐐🥳#ISL #IndianFootball #LetsFootball #SunilChhetri pic.twitter.com/dcLC1hoKJ5
— Indian Super League (@IndSuperLeague) August 3, 2023
तिथून पुढे सुनील 2013पासून आजपर्यंत बेंगळूरु फुटबॉल क्लब साठी खेळतोय. या क्लबने छेत्रीच्या नेतृत्वाखाली दोनदा आय लीगचे विजेतेपद पटकावले. तसेच 6 वेळा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा प्लेअर ऑफ द इअर हा खिताब सुद्धा त्याने पटकावला आहे. सुनीलच्या फुटबॉल मधल्या कामगिरी मुळेच त्याला 2011 साली अर्जुन अवॉर्ड तर 2019 साली पद्मश्री पुरस्काराने गौरविले गेले.
आज वयाची 39 वर्ष पूर्ण करणारा सुनील अजून 2-3 वर्ष तरी फुटबॉल खेळेल हे त्याच्या फिटनेस वरून लक्षात येते. जसे कपिल देव यांना वर्ल्ड कप जिंकताना पाहून सचिनने सुद्धा वर्ल्ड कप जिंकायचे स्वप्न पाहिले आणि 2011 ला ते पूर्ण केले तसेच भारतीय संघ येणाऱ्या वर्ल्डकप साठी पात्र ठरण्याची कोणतीही आशा नसताना मात्र सुनील कडे पाहून अनेक नवीन खेळाडू येतील आणि येत्या काही वर्षात भारत वर्ल्ड कप खेळताना दिसेल आणि त्याचे श्रेय नक्कीच कुठेतरी सुनीलला सुद्धा असेल. (Sunil Chettri and his inexplicable talent for the game made fans fall for him)
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय फुटबॉलचा आधारस्तंभ- सुनील छेत्री
BREAKING: अखेर क्रीडा मंत्रालयाची माघार! भारताचे दोन्ही फुटबॉल संघ खेळणार एशियन गेम्स