भारतात फुटबॉल म्हटलं की सर्वसामान्य लोक एकच नाव घेतात – सुनील छेत्री. त्याच्याआधी बायचुंग भुतियाचा काही प्रमाणात असा प्रभाव होता. पण सुनीलची गोष्टच निराळी आहे. भारतीय फुटबॉलची परिस्थिती गेली अनेक वर्षे फारशी चांगली नाही. असे असूनही भारतीय फुटबॉल संघाचे चाहते मात्र वाढतच आहेत. ह्याला जर कुणी कारणीभूत असेल तर तो सुनील छेत्री. क्रिकेटमध्ये चाहते धोनीला जसं मानतात तसेच फुटबॉलमध्ये छेत्रीला मानतात. किती? तर कर्णधाराने आवाहन केले की तुम्ही आमचा सामना बघायला या, तर सामना ‘सोल्ड आऊट’ झाला. 3 ऑगस्ट रोजी सुनील त्याचा 39वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा खास लेख.
भारतात युरोपियन फुटबॉलचे चाहते लाखोंनी आहेत. ते एकमेकांशी आपापल्या आवडत्या क्लबवरून हमरीतुमरीवर सुद्धा येतात. पण हेच चाहते भारतीय फुटबॉलची गोष्ट आली की उदासीन असतात. अशाच चाहत्यांना सुनीलने ट्विटरवर एक व्हिडीओ अपलोड करत आवाहन केले होते. “तुम्हाला शिव्याच द्यायच्या आहेत तर स्टेडियममध्ये येऊन द्या!” त्याच्या या आवाहनाला प्रतिसाद देत चाहत्यांनी सामना ‘सोल्ड आऊट’ केला. ज्यांना भारतातील फुटबॉलची फारशी माहिती नाही त्यांना सामना ‘सोल्ड आऊट’ होणं म्हणजे संघासाठी किती मोठी गोष्ट आहे हे कदाचित लक्षात येणार नाही.
गेली 18 वर्षे सुनील भारतीय संघासाठी फुटबॉल खेळतोय. 17वर्षे!! आपण फक्त क्रिकेटमध्येच 15-20 वर्षे खेळलेले लोक पाहिलेत, ऐकलेत. सर्वसामान्य लोकांच्या मते ज्या खेळाला भारतात भविष्य नाही अशा खेळात कारकीर्द घडविणे, भारतीय संघात स्थान मिळवून कर्णधारपदापर्यंत पोहोचणे सोपी गोष्ट नाही. या सतरा वर्षात सुनीलने भारतासाठी 142 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 92 गोल केले आहेत. 84वा गोल करताना सुनीलने हंगेरीचा दिग्गज फेरेंक पुस्कस यांची बरोबरी केली. सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये फक्त रोनाल्डो (123) त्याच्यापुढे आहे. युरोपियन फुटबॉलचे भक्त असणाऱ्या चाहत्यांचा लाडका मेस्सी 103 गोल्ससह दुसऱ्या स्थानी आहे. फक्त गोलांच्या संख्येवर मी सुनीलला मेस्सीपेक्षा श्रेष्ठ ठरविण्याची घोडचूक करणार नाही. पण आंतरराष्ट्रीय सामन्यांत, भले ते कोणत्याही संघाच्या विरुद्ध असले तरी एवढे गोल करणे नक्कीच सोपे नाही.
👑 HAPPY BIRTHDAY, SKIP! May your reign be everlasting – Captain, Leader, Legend forever ✨
📸 Getty • #sunilchhetri #happybirthday #BFC #bengalurufc #indianfootball #BharatArmy pic.twitter.com/3ReYSJrdPB
— The Bharat Army (@thebharatarmy) August 3, 2022
सुनीलचे वडील भारतीय सैन्यदलातून फुटबॉल खेळलेले, आई नेपाळच्या राष्ट्रीय संघाची सदस्य असे असताना सुनील फुटबॉलपटू बनला नसता तरच नवल होते. दिल्लीच्या सिटी एफसीकडून काही काळ खेळल्यानंतर सुनील मोहन बागानसाठी खेळू लागला. फुटबॉलबद्दल फारशी माहिती नसणाऱ्या लोकांना किमान वर्तमानपत्राच्या शेवटच्या पानावरील बातम्यांमधून का होईना ‘मोहन बागान’ माहीत असतो. सुनील मोहन बागानमध्ये आला तेव्हाच बायचुंग भुतियासुद्धा याच क्लबसाठी खेळण्यासाठी आला. आधीच संघात होजे बॅरेटोसारखा स्टार स्ट्रायकरसुद्धा होता. साहजिकच सुनीलला या दोघांच्या छायेत रहावे लागले. एकीकडे ‘पुढचा बायचुंग भुतिया’ अशी गणना केल्या जाणाऱ्या सुनीलवर स्वतःला सिद्ध करण्याचे मानसिक दडपण होते. यातून कित्येकदा तो एकटाच रडत असे. आपण चुकीचे क्षेत्र निवडले की काय? असा प्रश्न त्याला पडत असे. यावेळी सुनीलच्या घरच्यांनी त्याला प्रचंड आधार दिला.
मोहन बागाननंतर सुनील जेसीटी एफसीसाठी बराच काळ खेळला. याच क्लबमधून त्याची कारकीर्द भरास येण्यास सुरुवात झाली. दरम्यान भारतीय संघासाठी सुनील चांगली कामगिरी करत होता. बायचुंग भुतियाच्या छायेत खेळताना त्याने 2007 साली पाच सामन्यांत सहा गोल केले. या कामगिरीमुळे ‘पुढचा बायचुंग भुतिया’ पासून ते ‘सुनील छेत्री’ अशी स्वतःची ओळख त्याने निर्माण केली. सुनील गोल करत होता आणि युरोपातील क्लब्जचे लक्ष वेधून घेत होता. त्याने बऱ्याच क्लब्जसाठी ट्रायलसुद्धा दिली. इंग्लिश क्लब ‘क्वीन्स पार्क रेंजर्स’ने त्याला तीन वर्षांसाठी करारबद्धसुद्धा केले. पण वर्क परमिट मिळालं नाही आणि सुनीलचे फुटबॉलची पंढरी इंग्लंडमध्ये खेळण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
तिथून परत आल्यावर तो काही काळ ‘ईस्ट बंगाल’ आणि ‘डेम्पो’ कडून खेळला. त्यानंतर अमेरिकेतील मेजर लीग सॉकरमधील क्लब कॅन्सस सिटी विझर्डसने (आत्ताचा स्पोर्टिंग कॅन्सस सिटी) सुनीलला करारबद्ध केले. या क्लबकडून त्याने मँचेस्टर युनायटेडविरुद्ध एक प्रदर्शनीय सामना खेळला होता. सुनीलच्या क्लब करिअरचा आलेख कायम वरखालीच राहिला. दरम्यान तो भारताकडून चांगली कामगिरी करतच होता. बायचुंग भुतिया 2012 मध्ये निवृत्त झाल्यावर सुनीलने भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. ती तो आजतागायत सांभाळतो आहे.
वेगवेगळ्या परदेशी क्लबकडून खेळूनही फारशी चांगली कामगिरी न झाल्याने सुनील चर्चिल ब्रदर्ससाठी लोनवर (स्पोर्टींग लिस्बनने सुनीलला चर्चिल ब्रदर्सकडे लोनवर पाठवले होते) खेळत होता. त्याने 6 सामन्यांत 13 गोलही केले पण सुनीलला स्वतःला काहीतरी खटकत होते. अखेर त्याने स्पोर्टींग लिस्बनला आपल्याला करारमुक्त करावे अशी विनंती केली. दरम्यान भारतातील आयलीगमध्ये एक नवा क्लब सुरु होत होता. बेंगळुरू एफसी नावाने. या क्लबने सुनीलला करारबद्ध केले. या क्लबसाठी खेळण्याचा निर्णय सुनीलसाठी अतिशय महत्वाचा ठरला. वयाच्या तिशीत असलेल्या एखाद्या खेळाडूला अशीही युरोपात फारशी संधी मिळत नाही. मात्र तरीही युरोपातील संधी सोडून भारतातील नवख्या क्लबबरोबर करार करणे तसे धोकादायक ठरू शकले असते. मात्र सुनीलने हा धोका पत्करला होता.
Watch his best goals in the #HeroISL history! 🍿#LetsFootball #SunilChhetri #BengaluruFC | @bengalurufc (2/2) pic.twitter.com/W4djZ4PwW3
— Indian Super League (@IndSuperLeague) August 3, 2022
अशात क्लबचे प्रशिक्षक ऍशले वेस्टवूड यांनी सुनीलला पहिल्याच सामन्यात बेंचवर बसवले. सुनीलसाठी हा अजून एक धक्का होता. त्याने मात्र पुन्हा एकदा मुंडी खाली घालून मेहनत करायला सुरुवात केली. प्रशिक्षकाशी संवाद साधत सुनीलने आपली जबाबदारी समजून घेतली. कधी नव्हे ते त्याने ‘लेफ्ट विंगर’ पोझिशनवर खेळत त्या सीझनमध्ये 15 गोल केले. बेंगळुरू एफसीने आपल्या पदार्पणातच आयलीगचे विजेतेपद मिळवले. सहसा स्टार खेळाडू जेव्हा एका क्लबकडून दुसऱ्या क्लबकडे जातात त्यावेळी आपल्याला पाहिजे त्याच पोझिशनवर आपण खेळणार ही त्यांची अट असते. याला अगदी रोनाल्डोही अपवाद नाही.या स्टार खेळाडूला अनुसरून प्रशिक्षक आपली संघबांधणी करतो, सामन्यातील डावपेच ठरवतो. सुनीलने मात्र आधी बेंगळुरू एफसी आणि नंतर भारतीय संघासाठी प्रशिक्षकांच्या योजनेप्रमाणे खेळण्यावर भर दिला. आपण एक स्ट्रायकर आहोत मग आपल्याला त्याच जागी खेळवले पाहिजे हा हट्ट त्याने धरला नाही. कुठेतरी आपण आता वयाची तिशी पार केली आहे, खेळाचा आनंद घेणे जास्त योग्य राहील असा विचार त्याच्याशी मनाला शिवला असेल. याचा त्याला तर फायदा झालाच शिवाय भारतीय संघालाही फायदा झाला. आकडेवारीच द्यायची झाली तर 2017 पासून सुनीलने भारतासाठी 37 सामन्यांत 32 गोल केले आहेत. यात सुनील संघाचा विचार करणारा खेळाडू आहे हेही अधोरेखित झाले. बेंगळुरू एफसीकडून खेळण्याआधी सुनील गोल करून सामने फिरवणारा खेळाडू होता. आता तो चालू सामन्याचा अभ्यास करून सामने फिरवणारा खेळाडू बनलाय. ‘गेम रीडर’ की काय म्हणतात तसं. हा बदल स्वतः सुनीलसाठी आणि बेंगळुरू एफसीसाठी लाभदायक ठरलाय.
दरम्यान सोशल मीडियाचा प्रभाव, आयएसएल, आय लीग सारख्या स्पर्धांना लाभणारा मोठा प्रेक्षकवर्ग यामुळे सुनीलची लोकप्रियता वाढतच गेली. आजमितीला सुनील भारतीय फुटबॉल संघाचा धोनी आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही इतकं त्याचे चाहते त्याला मानतात, त्याच्यावर प्रेम करतात.
विक्रमांचीच गोष्ट करायची तरी सुनीलने भारताकडून खेळलेले 142 सामने हा मोठा विक्रम आहे. ज्या देशात मुळात फुटबॉलमध्ये कारकीर्द करणे हा विचारसुद्धा मुलांच्या पालकांच्या मनाला शिवत नाही, त्या देशाकडून या खेळात 142 सामने खेळणे निश्चित कौतुकास्पद आहे. सध्या संघामध्ये सुनीलनंतर भारतासाठी सर्वाधिक 54 सामने आपला गोलकीपर गुरप्रीतने खेळले आहेत यावरून सुनीलची कामगिरी किती मोठी आहे लक्षात येईल. क्रिकेट खेळणाऱ्या अनेकांना 50 कसोटी सामन्यांचेही भाग्य मिळत नाही.
बायचुंग भुतिया निवृत्त झाल्यांनतर सुनीलने भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी यथायोग्य पेलली, अजूनही पेलतो आहे. आय.एम. विजयन, बायचुंग भुतिया यांच्यानंतर भारतीय फुटबॉलचा चेहरा होण्याची जबाबदारी सुनीलने योग्य निभावली.
भारतीय फुटबॉल सध्या एका संक्रमणातून जात आहे. परदेशी फुटबॉलपटूची नावे सांगताना न थकणाऱ्या चाहत्यांना काही वर्षांपूर्वी भारतीय फुटबॉल खेळाडूंची नावे विचारली की एखाद्या खेळाडूचे नाव माहित असले तरी समाधान मानावे अशी परिस्थिती होती. आता मात्र बदल घडतोय. सुनीलबरोबरच संदेश झिंगन, गुरप्रीत सिंग संधू, बलवंत सिंग, निखिल पुजारी, सहल अब्दुल समाद, उदांता सिंग, अनिरूध थापा ही नावं लोकांना किमान माहित आहेत. या खेळाडूंचे सोशल मीडियावरील बहुसंख्य फॉलोवर्स हे शाळा कॉलेजात जाणारे तरुण आहेत. या बदलाला कळत नकळतपणे सुनीलसुद्धा कारणीभूत आहे. या सगळ्यात सुनीलचे यशस्वी होणे गरजेचे होते. बायचुंग भुतिया निवृत्त झाल्यावर भारतीय फुटबॉलचा चेहरा बनलेला सुनील जर इथवर पोहोचला नसता तर आज कदाचित भारतीय मुलं फुटबॉलकडे कारकीर्द म्हणून बघत नसती. हा बदल घडून येण्यासाठी कुठेतरी सुनीलचे योगदान नाकारून चालणार नाही. अर्थात सुनीलनंतर कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.
A legend turns 3⃣8⃣ today 🤩
Let's wish @chetrisunil11 a very Happy Birthday, and relive that special free-kick 🤯#SunilChhetri 🐐 #BackTheBlue 💙 #BlueTigers 🐯 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/3bfeiHqYvb
— Indian Football Team (@IndianFootball) August 3, 2022
कधीकधी मनात विचार येतो, हाच सुनील भारताऐवजी युरोपातील एखाद्या फुटबॉलची महासत्ता वगैरे असणाऱ्या देशात जन्माला आला असता तर? त्याच्यातील कौशल्याला आणखी पैलू पडले असते का? हाच सुनील आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप यशस्वी झाला असता का? संघांना त्याची किंमत थोडी लवकर लक्षात आली असती का?आज आहे ती लोकप्रियता कमवायला त्याला वयाची 30 ओलांडेपर्यंत थांबावे लागले असते का? ब्राझीलमध्ये, स्पेनमध्ये जन्मला असता तर कदाचित त्याच्या गुणांची कदर थोडी लवकर झाली असती. त्याला फुटबॉलच्या सुविधा, सामन्यांचा सराव, चांगल्या दर्जाचे संघ, सहकारी एकूणच चांगल्या दर्जाचा फुटबॉल लाभला असता. सुनील स्वतःसुद्धा हे स्वीकारतो. मात्र त्याचवेळी भारतीय फुटबॉलला अजून किती मजल मारायची आहे याचीही त्याला जाणीव आहे. ब्राझीलच्या मुलाकडे असलेला टच भारतातील मुलाकडे उपजत असणे शक्य नाही हे तो उघडपणे सांगतो. कर्णधार म्हणून पत्रकार आणि चाहत्यांकडून अनेकदा त्याला भारत विश्वचषक कधी खेळणार हा प्रश्न विचारला जातो. भारताला अजून बरीच मजल मारायची आहे असे सांगत सुनील पुढील दहा वर्षात आपण आशियातील बलाढ्य संघ जपान,ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्यासोबत खेळण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे असे सांगतो. इतक्या वर्षात आपण आशियातील संघासमोर जर टिकत नसू तर विश्वचषकाचे स्वप्न लगेच पाहणे चुकीचे आहे हे तो अधोरेखित करतो. त्याच्या हयातीत एकदा का होईना भारत विश्वचषक खेळताना तो स्टँडसमध्ये असला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे.
आज सुनील वयाची 38 वर्षे पूर्ण करतो आहे. या वयातही त्याचा फिटनेस अत्त्युच्च दर्जाचा आहे. अजूनही 2-3 वर्षे तो निश्चित खेळू शकेल. वयाच्या तिसाव्या वर्षानंतर फुटबॉलपटू सामन्याची पूर्ण नव्वद मिनिटे खेळतोय असं खूप कमी वेळा होतं. सुनीलच्या बाबतीत मात्र असं नाहीये. आपल्याहून 10-12 वर्ष लहान असलेल्या पोरांबरोबर तो नव्वद मिनिटे मैदानात असतो. नुसता असतो नाही तर अगदी सामन्यात जीव ओतून खेळतो.
आपण विराट कोहलीच्या फिटनेसचे किस्से ऐकलेत. त्याने 4-5 वर्षे बटर चिकन खाल्लं नाहीये वगैरे. सुनीलने गेल्या 6-7 वर्षात त्याच्या बहिणीच्या लग्नाचा अपवाद सोडला तर गोड पदार्थ खाल्ला नाहीये. कॅप्टन म्हटलं की आपसूक दादा, धोनी, कोहली यांची नावं घेणारे लोक आता कॅप्टन म्हणून सुनीलचंही नाव घेतात हे त्याचे यश मानावे लागेल. एकीकडे क्रिकेटचे काही खेळाडू तिशीतच निवृत्त होत असताना चाहते सुनीलने मात्र अजून 2-3 वर्षे तरी खेळावे असे म्हणतात यातच काय ते सारे आले.
महत्त्वाच्या बातम्या-
BREAKING: अखेर क्रीडा मंत्रालयाची माघार! भारताचे दोन्ही फुटबॉल संघ खेळणार एशियन गेम्स
पाकिस्तान टॉपर असणाऱ्या ‘या’ विक्रमाच्या यादीत भारत पटकावणार दुसरा क्रमांक, बातमी लगेच वाचा