भारतीय फुटबॉलच्या इतिहासात सुनील छेत्रीने मोठे योगदान दिले आहे. त्याने आत्तापर्यंत त्याच्या खेळाच्या जोरावर भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिले आहे. नुकताच त्याने एक खास विक्रमही केला आहे.
सध्या भारतीय फुटबॉल संघ कतारमध्ये फिफा विश्वचषक २०२२ आणि आशिया चषक २०२३ स्पर्धेची पात्रता फेरी खेळत आहे. या स्पर्धेमध्ये ई-गटातील भारताचा दुसरा सामना सोमवारी (७ जून) बांगलादेशविरुद्ध सामना झाला होता. हा सामना भारताने २-० अशा फरकाने जिंकला. भारताकडून दोन्ही गोल कर्णधार सुनील छेत्रीने केले.
याबरोबरच त्याचे आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ७४ गोल झाले आहेत. त्यामुळे त्याने गोलच्या बाबतीत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत छेत्री मेस्सीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. मेस्सीच्या नावावर सध्या ७२ गोल आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. त्याच्या नावावर १०३ गोल आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर अली मबखूत आहे. त्याने ७३ गोल केले आहेत. मेस्सी ७२ गोलसह चौथ्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारे सक्रिय फुटबॉलपटू –
१०३ गोल – ख्रिस्तियानो रोनाल्डो
७४ गोल – सुनील छेत्री
७३ गोल – अली मबखूत
७२ गोल – लिओनेल मेस्सी
भारताचा बांगलादेशवर विजय
भारतीय संघाने सोमवारी बांगलादेशला पराभूत केले. या सामन्यात पुर्वाधात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. पण उत्तरार्धात छेत्रीने ७९ व्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल करत आघाडी मिळवली. तसेत नंतर त्याने इंज्यूरी टाईममध्ये दुसरा गोल केला. त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्यात यश मिळाले.
यापूर्वी भारताला ३ जून रोजी झालेल्या कतार विरुद्धच्या सामन्यात ०-१ फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. आता भारताचा पुढील सामना १५ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.