दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आज (10 जुलै) 75 वर्षांचे झाले. आपल्या काळात जगातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांचा सामना करणाऱ्या टीम इंडियाच्या या माजी कर्णधारानं पदार्पणाच्या मालिकेतच एक विश्वविक्रम रचला होता, जो आजही कायम आहे!
गावस्कर यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी बॉम्बे (आता मुंबई) येथे झाला. या उजव्या हाताच्या फलंदाजानं 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. कालांतरानं ‘लिटिल मास्टर’नं वेस्ट इंडिजच्या भयानक वेगवान आक्रमणाचा पर्दाफाश केला. हेल्मेटशिवाय खेळणाऱ्या गावस्कर यांनी ‘पोर्ट ऑफ स्पेन’मध्ये आपल्या शानदार फलंदाजीनं सर्वांचंच लक्ष वेधलं होतं.
सध्या समालोचकाची भूमिका बजावत असलेल्या सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक द्विशतक, 4 शतकं आणि 3 अर्धशतकांसह विक्रमी 774 धावा ठोकल्या. या दरम्यान त्यांची सरासरी 154.80 इतकी होती. पदार्पणाच्या मालिकेत गावस्कर यांनी जो विश्वविक्रम केला, तो 53 वर्षांनंतरही जगातील कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही!
कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे सुनील गावस्कर हे जगातील पहिले क्रिकेटपटू आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध 2749 धावा करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. या संघाविरुद्ध त्यांनी 13 शतकं झळकावली, जो एक विक्रम आहे. गावस्कर यांनी 18 वेगवेगळ्या खेळाडूंसोबत कसोटीत 58 शतकी भागीदारी केली आहे. अशी कामगिरी करणारे ते एकमेव क्रिकेटपटू आहेत. गावस्कर 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. ते 1970-80 च्या दशकात खूप लोकप्रिय होते.
सुनील गावस्कर यांनी 125 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतकं आणि 45 अर्धशतकांसह 10122 धावा केल्या. गावस्कर यांच्या नावावर 108 वनडेमध्ये 3092 धावा आहेत. त्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक शतक आणि 27 अर्धशतके केली आहेत. गावस्कर यांनी 348 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 25834 धावा केल्या, ज्यात 81 शतकं आणि 105 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताला WTC विजेतेपद मिळवून देईल हा स्टार खेळाडू, 6 वर्षांपूर्वी खेळला होता शेवटचा कसोटी सामना
कोहली-रोहित नव्हे तर या फलंदाजाला गोलंदाजी करणं अवघड जातं, जेम्स अँडरसनचा खुलासा
श्रेयस अय्यर संघात नाही, तर गंभीर कोणाला बनवणार भारताचा टी20 कर्णधार? या खेळाडूचं नाव आघाडीवर