भारतीय क्रिकेट संघाचा आशिया चषक 2022 मधील प्रवास जवळपास संपला आहे. भारतीय संघाने त्यांचे सुपर-4 फेरीतील सलग दोन सामने गमावले आहेत, ज्यामुळे त्यांचा अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मार्ग अवघड बनला आहे. या अपयशी कामगिरीनंतर भारताच्या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. अगदी माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनीही भारताच्या संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच वर्कलोडबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीलंका विरुद्ध भारत या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 173 धावा फलकावर लावल्या. भारताकडून कर्णधार रोहितने एकाकी झुंज दिली. 41 चेंडू खेळताना त्याने 72 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 5 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव 34 धावा करू शकला. प्रत्युत्तरात सलामीवीर पथुम निसांका (52 धावा) आणि कुसल मेंडिस (57 धावा) यांच्या खेळींच्या जोरावर श्रीलंकेने 1 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने सामना जिंकला.
या सामन्याबद्दल इंडिया टुडेशी बोलताना गावसकर म्हणाले की, टी20 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाला प्रयोग करणे थांबवावे लागतील. तसेच वर्कलोडबद्दलच्या चर्चांवर पूर्णविराम लावण्याचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी भारतीय संघाला टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने कामाचा सल्लाही दिला आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी20 विश्वचषकाला लक्षात घेत गावसकर म्हणाले की, “तुम्ही एकाच संघासोबत खेळ नाहीये. जेव्हा पूर्ण संघ खेळत असतो, तेव्हा तुम्ही एका लयीत असता. तुम्ही नक्कीच प्रयोग करा, यात चुकीचे असे काहीच नाही. एका संघात नेहमी 3 किंवा 4 स्थान असतात आणि त्या खेळाडूंमधील प्रतिभा ओळखण्याच्या प्रयत्नात तुम्ही वेगवेगळे संघ उतरवता. हे सर्वांनाच माहितीय, जेव्हा संघात एखादा वेगळा खेळाडू येतो, तेव्हा त्याला सर्वांमध्ये मिसळायला वेळ लागतो.”
“मी विचार केला होता की, आशिया चषकापूर्वी झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात अधिकांश आशिया चषक आणि टी20 विश्वचषकातील सहभागी खेळाडूंना खेळवले जाईल. आता अचानक तुमच्याकडे असे काही 4-5 खेळाडू आले आहेत, ज्यांनी झिम्बाब्वेत चांगले प्रदर्शन केले. परंतु ते आशिया चषकाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सोडा साध्या ताफ्यातही नाहीत. असे असले तरीही, मला टी20 विश्वचषकापूर्वी जास्त काळजी वाटत नाहीये, कारण आपल्या हातात आणखी काही सामने आहेत. फक्त या सामन्यांमध्ये कोणतेही प्रयोग करू नका”, असे गावसकर म्हणाले.