---Advertisement---

‘या’ फलंदाजाचा नादच खुळा, कसोटीत १० हजार धावा करणाऱ्या गावसकरांना करायचीय त्याच्यासारखी फलंदाजी

On: गुरूवार, जून 3, 2021 5:00 PM
---Advertisement---

क्रिकेट या क्रिडाप्रकाराची सुरुवात कसोटी स्वरुपाने झाली. प्रतिस्पर्धी संघ ५ किंवा त्यापेक्षा जास्त दिवस कसोटी क्रिकेट सामना खेळत असायचे. परंतु वेळेनुसार क्रिकेटच्या स्वरुपात गती आली आणि ५० षटकीय वनडे क्रिकेट व २० षटकीय टी२० क्रिकेटलाही सुरुवात झाली. १९ च्या दशकातील कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या माजी दिग्गजांना टी२० स्वरुपात अधिक रस नसल्याचे दिसते. परंतु महान भारतीय फलंदाज सुनिल गावसकर हे या गोष्टीस अपवाद आहेत. त्यांनी स्वत: टी२० क्रिकेट रोचक असल्याचे सांगितले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये १०००० हून अधिक धावा बनवणारे गावसकर टी२० क्रिकेटमध्ये फलंदाजांना अप्रतिम शॉट मारताना पाहून नि:शब्द होत असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. ‘द एनालिस्ट इंसाइड’ पॉडकास्टशी ते बोलत होते.

गावसकर म्हणाले की, “मला माहिती आहे माझ्या दशकातील बरेचसे क्रिकेटपटू टी२० स्वरुपाशी नाखुश आहेत. परंतु मला हा क्रिकेट प्रकार खूप आवडतो. मला टी२० क्रिकेट रोचक वाटण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, सर्वांना माहिती असते की टी२० सामना केवळ ३ तासच होणार आहे आणि त्यानंतर सामन्याचा निकाल आपल्याला कळणार आहे. विशेष म्हणजे, टी२० सामन्यामध्ये आक्रमक खेळी पाहायला मिळते. एखाद्या फलंदाजाने स्विच हिट किंवा रिव्हर्स स्वीप खेळला तर मी माझ्या खुर्चीवरुन उठून उभा राहतो. कारण मला हे खूप शानदार आणि अतुलनीय वाटते. अशाप्रकारे षटकार मारण्यास खूप प्रतिभा आणि शैली असण्याची गरज असते.”

या चर्चासत्रादरम्यान ‘लिटल मास्टर’ गावसकरांना एक प्रश्न विचारण्यात आला. आधुनिक युगातील एक असा फलंदाज सांगा, ज्याच्यासारखी फलंदाजी तुम्हाला करायची आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना गावसकर म्हणाले, “एबी डिविलियर्स. मला डिविलियर्ससारखी फलंदाजी करायची आहे. तो ३६० डिग्री शॉट खेळणारा फलंदाज आहे. तो मैदानावरही अशी फलंदाजी करतो जणू काही सराव सत्रात करत आहे.”

“डिविलियर्सने फलंदाजीला खूप सोपे बनवले आहे. तो मोठमोठे शॉट मारत असतो. त्याच्या फलंदाजीचा अंदाजही खूप निराळा आहे. जेव्हा तो लांबलचक शॉट मारतो, तेव्हा मला त्याच्या बॅटचा खांद्यावरुन जाणारा फॉलो थ्रू पाहण्यास खूप मजा येते. त्याचे पंच शॉटही खूप अप्रतिम असतात. मला त्याला फलंदाजी करताना बघायला खूपच आवडते,” असे पुढे गावसकर म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---