कसोटीमध्ये टीम इंडियासाठी गेल्या 13-14 वर्षांतील सर्वात मोठा मॅचविनर राहणाऱ्या आर अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अश्विनचा कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. परंतु त्यानं मालिकेच्या मध्यातच निवृत्ती घेतली. अश्विनच्या निवृत्तीनंतर आता विविध गोष्टी बोलल्या जात असून निवृत्तीची घोषणा करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा दावाही केला जात आहे.
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अश्विनच्या निवृत्तीसाठी भारतीय टीम मॅनेजमेंटला जबाबदार धरलं असून गावस्कर यांनी मॅनेजमेंटवर जोरदार टीका केली आहे. सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतानं पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये तीन वेगवेगळे फिरकीपटू मैदानात उतरवले. वॉशिंग्टन सुंदर पर्थमध्ये, आर अश्विन ॲडलेडमध्ये आणि त्यानंतर रवींद्र जडेजा ब्रिस्बेनमध्ये खेळला.
‘मिड डे’ मधील आपल्या कॉलममध्ये गावस्कर यांनी टीम मॅनेजमेंटवर टीका केली. गावस्कर म्हणाले, “विदेशात फलंदाज आणि गोलंदाजांना वेगळी वागणूक दिली जाते. घरच्या कसोटीत अश्विनला ड्रॉप करण्याचं कोणतंही कारण नाही, कारण मॅनेजमेंटला माहित होतं की ते त्याच्याशिवाय सामना जिंकू शकत नाहीत. विदेशात खेळपट्टी आणि परिस्थिती अश्विनसारख्या गोलंदाजाला अनुकूल नाही, असं म्हटलं जातं. मग फलंदाजांबाबत असं का केलं जात नाही?”
एवढेच नाही तर अश्विन कसोटीत यशस्वी कर्णधार होऊ शकला असता, पण त्याला ही संधी देण्यात आली नाही, असं गावस्कर यांना वाटतं. त्यांनी आपल्या कॉलममध्ये लिहिलं, “अश्विन टीम इंडियासाठी चांगला कर्णधार ठरू शकला असता, पण त्याला उपकर्णधार होण्याचीही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मानं अश्विनला त्याच्या 100व्या कसोटीत कर्णधारपदाची संधी दिली हे पाहून बरं वाटलं,” असं गावस्कर म्हणाले.
हेही वाचा –
IND vs AUS; मेलबर्नच्या खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत? फलंदाज की गोलंदाज?
बिझनेसमुळे वादात सापडलेले 5 भारतीय क्रिकेटपटू, धोनी-कोहलीच्या नावाचाही समावेश
माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दिला रोहित शर्माला गुरुमंत्र, खराब फॉर्ममधून दिलासा मिळणार?