लिटल मास्टर… हे टोपणनाव तर सर्वांनाच माहीत असेल नाही का? होय हे नाव आहे त्या खेळाडूचे ज्याने कसोटीत 10000 धावांचा टप्पा पार करत असा पराक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज बनण्याचा मान मिळविला होता. ते खेळाडू इतर कोणीही नसून भारतीय संघाचे दिग्गज माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर आहेत. गावसकर सोमवारी (दि. 10 जुलै) आपला 74वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी मुंबईत झाला होता. यानिमित्त आपण त्यांच्या आयुष्यातील रंजक गोष्टींबाबत जाणून घेऊयात…
गावसकरांनी भारतीय संघाकडून खेळताना 125 कसोटी सामने आणि 108 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत 51.12च्या सरासरीने 10122 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी 34 शतके ठोकली आहेत. त्याचबरोबर वनडेत त्यांनी 35.13च्या सरासरीने 3092 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 1 शतकाचा समावेश आहे.
गावसकर त्यांचा 74वा वाढदिवस साजरा करत आहेत, तर त्या निमित्ताने आपण या लेखात त्यांच्या आयुष्यातील 10 गोष्टींवर नजर टाकणार आहोत.
सुनील गावसकरांबद्दल 10 रंजक गोष्टी
– गावसकरांनी मार्च 1971 साली पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते.
– त्यांनी 1975च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 60 षटकांच्या सामन्यादरम्यान 174 चेंडू खेळताना केवळ 36 धावा केल्या होत्या.
– 1987 च्या विश्वचषकात गावसकरांनी न्यूझीलंडविरुद्धच्या एका वनडे सामन्यात 88 चेंडूत नाबाद 103 धावांची शतकी खेळी केली होती.
– सुनील गावसकरांनी ‘सावली प्रेमाची’ (1974) या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
– कर्नाटकविरुद्ध मुंबईकडून खेळताना रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यात खराब खेळपट्टीला विरोध दर्शविण्यासाठी गावसकरांनी डाव्या हाताने फलंदाजी केली होती.
– गावसकर आपल्या रणजी ट्रॉफीतील पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर त्यांनी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले होते. तरीही त्यांना पुढील सामन्यातून वगळण्यात आले होते.
– गावसकर हे कसोटीत 10000 धावा करणारे जगातील पहिले फलंदाज आहेत. त्यांनी हा कारनामा 1987 साली पाकिस्तानविरुद्ध आपल्या 124व्या कसोटी सामन्यात केला होता.
– गावसकरांच्या जन्मावेळी त्यांना रुग्णालयात अंघोळ घालताना परिचारिकेच्या चूकीमुळे ते एका मच्छीमाराच्या पत्नीकडे गेले होते. परंतु त्यांच्या एका नातेवाईकांनी त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या कानाच्या वर एक होल पाहिले होते, त्यामुळे ते आपल्या कुटुंबाकडे पुन्हा आले. गावसकरांनी आपली आत्मकथा ‘सनी डेज’मध्ये लिहिले होते, “जर एका चाणाक्ष दृष्टी असणारे माझे नातेवाईक नारायण मसुरकर माझ्या जन्मावेळी माझ्या जवळ नसते, तर मी कधीच क्रिकेटपटू बनू शकलो नसतो आणि हे पुस्तकही निश्चितच लिहिले गेले नसते.”
त्यांनी पुढे लिहिले होते, “असे वाटते की नान- काका (मी त्यांना या नावाने पुकारायचो), जे या जगात माझ्या पहिल्या दिवशी रुग्णालयात मला पाहायला आले होते. त्यांनी माझ्या डाव्या कानाच्या वर एक लहानसा होल पाहिला होता.”
– गावसकर कधीच स्लेजिंग (अपशब्द वापरणे) करत नव्हते आणि विरोधी संघही त्यांच्याविरुद्ध स्लेजिंग करण्यावाचून सावध राहायचे. कारण ते अधिक चांगली कामगिरी करत असायचे.
– सुनील गावसकर कधीच धावफलकाकडे पाहत नव्हते. यामुळेच त्यांनी अनेकवेळा चांगल्या खेळी करूनही त्यांचा आनंद साजरा केला नाही. कारण त्यांना ते माहीतच नसायचे. असे म्हटले जाते की, डॉन ब्रॅडमन यांच्या 29 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याचेही गावसकरांना माहीत नव्हते. (sunil gavaskar one of the greatest openers of all time was born in bombay on this day)
महत्वाच्या बातम्या-
घातक वेगवान गोलंदाजांविरुद्ध हेल्मेटशिवाय का खेळायचे गावसकर? ‘हे’ होतं कारण
रोहितच्या नेतृत्वावर भडकले गावसकर; म्हणाले, ‘कर्णधार म्हणून 100पेक्षा जास्त IPL सामने खेळूनही…’