दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका पराभूत झाल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केएल राहुलला कर्णधारपद देण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. केएल राहुलने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ४ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्या ४ सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यावर सुनील गावसकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीसोबतच एकदिवसीय मालिका सुद्धा भारताने गमावली. एकदिवसीय मालिका आफ्रिकेने ३-० ने नावावर केली. ही मालिका गमवल्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केएल राहुलच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी क्रिकेट बोर्डावरसुद्धा ताशेरे ओढले.
सुनील गावसकरांनी संघ व्यवस्थापनाला प्रश्न विचारत म्हटले आहे की, “केएल राहुलने आजपर्यंत कधी कर्नाटक संघाचे कर्णधारपद सांभाळले नाही. केएल राहुलला कोणत्याही कर्णधारपदाच्या अनुभवाशिवाय कर्णधार बनवणे घातक ठरले. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतही नेतृत्व करण्याची संधी सुद्धा दिली गेली.”
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला होता. अशा परिस्थितीत संघाचे कर्णधारपद केएल राहुलच्या हाती देण्यात आले. मात्र, केएल राहुल कर्णधारपद सांभाळण्यात अपयशी ठरला. या मालिकेत त्याने कर्णधारपद भूषवलेल्या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावे लागले.
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुढील कसोटी कर्णधारासाठी केएल राहुलचे नावही समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत केएल राहुल ज्या प्रकारे अयशस्वी झाला, ते पाहता केएल राहुलचे कसोटी कर्णधारपदाचे स्वप्न आता भंगल्याचे दिसत आहे.
सुनिल गावसकरांनी केएल राहुलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधारपद देण्यावर म्हटले आहे की, “केएल राहुलला कर्णधारपदाचा अनुभव नाही. त्याने फक्त आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ काही खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे काहीच अनुभव नसताना केएल राहुलला कर्णधारपद देऊन संघाचे नुकसान होईल. केएल राहुल लिस्ट ए किंवा रणजी ट्राॅफीमध्ये कोणत्याही संघाचे नेतृत्व करताना दिसला नाही. जर त्याला कर्णधार बनवायचे असेल तर, थोडा संयम ठेवावा लागणार आहे.”
भारतीय संघ पुढील कसोटी मालिका वेस्ट इंडीजसोबत भारतातच खेळणार आहे. दोन्ही संघ प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि टी२० मालिका खेळताना दिसणार आहेत. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-