मुंबई । कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मार्चनंतर सर्वच क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान फुटबॉलने मैदानावर पुनरागमन केले आहे, पण क्रिकेटची मैदाने अद्याप शांतच आहे. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे.
जुलै महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. याच दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ऑक्टोबरपर्यंत क्रिकेट खेळणे सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
गावसकर म्हणाले की, “इंग्लंड आणि वेस्टइंडीज यांच्यात ‘बायो-सिक्योर एन्वॉयरमेंट’ मध्ये होणारी कसोटी मालिका एक चांगले उदाहरण आहे, पण कोरोना व्हायरस वेगाने वाढत असल्यामुळे क्रिकेट होणे अवघड आहे. सध्या आम्ही सोशल डिस्टन्सचे पालन करत आहेत. डॉक्टरांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे पालन करावे तसेच आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.”
“कोरोनाच्या तपासणी जसे वाढत आहेत तसतसे कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढत आहे म्हणून मला वाटते की, पुढचे दोन महिने क्रिकेट खेळणे सुरक्षित नाही. ऑक्टोंबरपर्यंत क्रिकेट होणे अवघड आहे. पुढील महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारी कसोटी मालिका एक चांगला प्रयोग आहे. यातून आपल्याला समजून येईल की आपण क्रिकेट खेळू शकतो अथवा नाही.”
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आठ जुलैपासून सुरुवात होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना एजेस बाऊल येथे खेळवला जाणार आहे.