पहिल्या कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सने पराभवाचे पाणी पाजत भारताने मालिकेत दमदार पुनरागमन केले. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया पुढील तिसरा कसोटी सामना ७ जानोवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला रोहित शर्मा या सामन्याचा भाग असणार आहे. अशात बॉक्सिंग डे कसोटीत खराब कामगिरी केलेल्या सलामीवीर मयंक अगरवालला तिसऱ्या सामन्यातून डच्चू मिळू शकतो. माजी भारतीय फलंदाज सुनिल गावसकर यांनी याविषयी त्यांचे मत मांडले आहे.
“रोहितसोबत मयंकने करावी सलामीला फलंदाजी”
गावसकर यांच्या मते सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहितसोबत मयंकनेच सलामीला फलंदाजीसाठी जावे. सोनी चॅनलच्या स्पोर्ट्स शो मध्ये ते बोलत होते. गावसकर म्हणाले की, “माझ्या मते सिडनीत होणाऱ्या कसोटी सामन्यात रोहितसोबत मयंकने सलामीला फलंदाजीला जावे. मला माहिती आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आतापर्यंत त्याचा फॉर्म चांगला राहिला नाही. पण तो एक शानदार खेळाडू आहे आणि त्याला रोहितसोबत सलामीला फलंदाजी करण्याची संधी देण्यात यावी.”
“शुबमन गिलला पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात यावे”
युवा फलंदाज शुबमन गिल याला बॉक्सिंग डे सामन्यात पृथ्वी शॉ याच्या जागी स्थान देण्यात आले होते. या पदार्पणवीराने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात प्रभावी फलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने ४५ धावा आणि दुसऱ्या डावात ३५ धावांची मॅच विनिंग खेळी केली होती.
गावसकर यांना गिलविषयी विचारले असता ते म्हणाले की, “मला माहिती आहे की गिल वरच्या फळीत चांगल्या लयीत खेळत असल्याचे दिसत आहे. पण मला नाही वाटत की सिडनीच्या मैदानावर त्याला वरच्या फळीत फलंदाजीसाठी पाठवावे. त्याने यापुर्वी १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये खालच्या फळीत दमदार प्रदर्शन केले आहे. त्यामुळे मला वाटते की, त्याच्यासाठी पाचवा क्रमांक सर्वोत्कृष्ट असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
स्टीव स्मिथ साठी आनंदाची बातमी, तब्बल ४ महिन्यानंतर भेटणार आपल्या पत्नीला
“एनसीएची इच्छा होती की रोहितने त्याचे वजन थोडे कमी करावे”, पाहा कोणी केलंय हे भाष्य
टीम इंडिया सावधान! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू करतोय पुनरागमन