कोलकाता नाईट रायडर्स हा आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज नंतर तिसरा सर्वात यशस्वी संघ आहे. एमआय आणि सीएसकेने प्रत्येकी 5 वेळा विजेतेपद जिंकले आहे, तर केकेआरने तीन वेळा ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले आहे. गेल्या हंगामात कोलकाताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती, याआधी संघाने 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली विजेतेपद जिंकले होते. गेल्या 12-13 वर्षांत, केकेआरचा आयपीएलमधील प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. या काळात अनेक कर्णधार बदलले, परंतु एक खेळाडू असा होता जो सतत संघासोबत राहिला. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सुनील नारायण आहे.
नारायणने प्रत्येक हंगामात संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहेच, पण वेस्ट इंडिजच्या या खेळाडूने कोलकाताने आतापर्यंत जिंकलेल्या तिन्ही जेतेपदांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता नारायणने फ्रँचायझीसाठी एक असा पराक्रम केला आहे जो आयपीएलच्या इतिहासात कोणताही गोलंदाज करू शकला नाही.
गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात नारायणला 1 विकेट मिळाली, या एका विकेटसह सुनील नारायणने केकेआरसाठी 200 विकेट घेण्याचा विक्रम केला. नारायणने आयपीएलमध्ये कोलकाताकडून 182 विकेट्स घेतल्या आहेत, तर चॅम्पियन्स लीग टी-20 मध्ये, नारायणने या संघासाठी 18 यश मिळवले आहेत.
सुनील नरेन आयपीएलच्या इतिहासात फ्रँचायझीसाठी २०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज आहे. या यादीत इंग्लंडचा समित पटेल अव्वल स्थानावर आहे. त्याने नॉटिंगहॅमशायरकडून आतापर्यंत एकूण 208 विकेट्स घेतले आहेत.
टी20 मध्ये संघासाठी सर्वाधिक विकेट्स –
समित पटेल (नॉटिंगहॅमशायर) 208
सुनील नारायण (केकेआर) 200
ख्रिस वूड (हॅम्पशायर) 199
लसिथ मलिंगा (मुंंबई इंडियन्स) 195
डेव्हिड पेन (ग्लॉस्टरशायर) 193






