श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सनं रविवारी (26 मे) रात्री आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे केकेआरनं 10 वर्षांनंतर ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. केकेआरच्या या विजयाचे अनेक नायक आहेत, पण एक खेळाडू असा आहे ज्यानं हंगामाच्या सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी केली आणि तो या आयपीएलचा ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ (MVP) बनला. हा खेळाडू दुसरा कोणी नसून सुनील नारायण आहे!
नारायण हा आयपीएलच्या इतिहासात MVP पुरस्कार तीनदा जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2017 आणि 2018 मध्ये त्यानं हा पुरस्कार जिंकला होता. तर 2012 मध्ये तो ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ही ठरला होता. सुनील नारायणनं आपल्या धारदार गोलंदाजीसह स्फोटक फलंदाजीनं संपूर्ण हंगामात खळबळ उडवून दिली होती. केकेआरनं या हंगामात पुन्हा एकदा नारायणसह डावाची सुरुवात करण्याचं धोरण अवलंबलं आणि वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूनं संघाची निराशा केली नाही.
आयपीएल 2024 मध्ये खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये सुनील नारायणनं 180.74 च्या स्ट्राइक रेटनं 488 धावा ठोकल्या. हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो 9व्या क्रमांकावर राहिला. तर गोलंदाजीत त्यानं 17 विकेट घेतल्या. हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो 11व्या स्थानावर राहिला.
आयपीएलमध्ये MVP पुरस्कार 2013 मध्ये सुरू झाला. त्याआधी हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार देण्यात यायचा. सुनील नारायण शिवाय त्याच्याच देशाचा आंद्रे रसेल आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन यांनी प्रत्येकी दोनदा आयपीएलमध्ये एमव्हीपी पुरस्कार जिंकला आहे.
आयपीएलमध्ये ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार जिंकणारे खेळाडू –
2008 – शेन वॉटसन
2009 – ॲडम गिलख्रिस्ट
2010 – सचिन तेंडुलकर
2011 – ख्रिस गेल
2012 – सुनील नारायण
आयपीएलमध्ये ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ (MVP) पुरस्कार जिंकणारे खेळाडू –
2013 – शेन वॉटसन
2014 – ग्लेन मॅक्सवेल
2015 – आंद्रे रसेल
2016 – विराट कोहली
2017 – सुनील नारायण
2018 – सुनील नारायण
2019 – आंद्रे रसेल
2020 – जोफ्रा आर्चर
2021 – हर्षल पटेल
2022 – जोस बटलर
2023 – शुबमन गिल
2024 – सुनील नारायण
महत्त्वाच्या बातम्या –
संघाचा लाजिरवाणा पराभव सहन झाला नाही, काव्या मारन चालू मॅच मध्येच स्टेडियममधून निघून गेली