आयपीएल 2021 चा नववा सामना रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि डेविड वॉर्नरच्या सनरायजर्स हैदराबाद संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 गडी गमावून 150 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने 19.4 षटकांत सर्वबाद केवळ 137 धावा केल्याने मुंबई इंडियन्सने 13 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला.
यानंतर सामन्यानंतरच्या सादरीकरणात बोलताना हैदराबाद संघाच्या कर्णधार डेविड वॉर्नरने संघातील काही खेळाडूंना या पराभवाबद्दल जबाबदार धरले आहे.
सनरायझर्सचा कर्णधार वॉर्नरने या सामन्यातील पराभवासाठी आपल्या फलंदाजांना जबाबदार ठरवत सांगितले की, “आमच्यासोबत हे काय घडत आहे आणि यासाठी काय करावे हे मला समजत नाही. असा पराभव होणे संघासाठी साहजिकच अत्यंत निराशाजनक आहे. आम्ही स्फोटक फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात दिली. पण जर संघाच्या फलंदाजीमध्ये खोली नसेल, तर आपण सामना जिंकू शकत नाही.”
पुढे आपल्या निवेदनात तो म्हणाला की, “हार्दिकने उत्तम क्षेत्ररक्षण करत मला धावबाद केले. हा एक खेळाचा एक भाग आहे. परंतु तुम्ही एखादी चांगली भागीदारी करून एखादा खेळाडू खेळपट्टीवर जम बसवून खेळत असेल तर शेवटी लक्ष्य नक्कीच साध्य करू शकता. म्हणून आता आम्हाला चांगले क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये आमच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली परंतु मागच्या सामन्यापेक्षा या सामन्यात खेळपट्टीची गती खूप कमी होती. परंतु आम्हाला चुकांमधून शिकत पुढे जावे लागेल आणि चेहऱ्यावर हास्य ठेवावे लागेल.”
पुढे केन विलियम्सन संघातील स्थानाबद्दल बोलताना तो म्हणाला की, “आम्हाला विलियम्सनबद्दल डॉक्टरांशी बोलावे लागेल. तो त्याच्या दुखापतीतून बरा होत असून आमच्या संघात त्याची खूप मोठी भूमिका आहे.”
केन विल्यमसनला लवकरात लवकर संघाच्या अंतिम अकरामध्ये संधी देण्याची वॉर्नरची इच्छा असल्याचे त्याने आपल्या वक्तव्याद्वारे स्पष्ट केले आहे. सनरायझर्सचा पुढील सामना 21 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरूद्ध असून या सामन्यात विलियम्सन खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी
सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI
MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर