कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा अत्यंत वाईट पद्धतीनं पराभव करत विजेतेपद पटकावलं. केकेआरनं हे तिसरं विजेतेपद आहे. केकेआरनं सामन्यावर पहिल्या चेंडूपासून नियंत्रण मिळवलं होतं, जे त्यांनी शेवटपर्यंत कायम राखलं.
अंतिम सामन्यातील पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं पराभवाची कारणं सांगितली आहेत. कमिन्स म्हणाला की, आम्ही धावा कमी केल्या. तो म्हणाला की, ही अशी खेळपट्टी नव्हती, ज्यावर 200 पेक्षा जास्त धावा करता येतील.
सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात पॅट कमिन्स म्हणाला, “कोलकातानं शानदार गोलंदाजी केली. आमच्यासाठी दुर्दैवानं मिचेल स्टार्कनं पुन्हा चांगली गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. आज रात्री आम्ही खूप वाईट खेळलो. आम्ही चौकार-षटकार मारू शकलो नाही. मागील आठवड्यात अहमदाबादमध्येही असंच घडलं होतं. याचं सर्व श्रेय त्यांना (केकेआरच्या गोलंदाजांना) जातं. त्यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली. जर आम्ही 160 च्या आसपास धावा केल्या असत्या, तर आम्ही सामन्यात टिकून राहिलो असतो.”
कमिन्स पुढे म्हणाला की, “या हंगामात बऱ्याच सकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या. आम्ही ज्या शैलीनं खेळलो, विशेषत: बॅटनं आम्ही तीन वेळा 250 हून अधिक धावा केल्या, त्यासाठी खूप कौशल्य लागतं. हैदराबादच्या चाहत्यांना हे फार आवडलं. हा एक चांगला हंगाम होता. मी यापूर्वी यांच्यापैकी अनेकांसोबत खेळलो नव्हतो.”
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पुढे म्हणाला की, “भुवनेश्वर कुमार सारख्या अनुभवी खेळाडूसोबत खेळणं खरोखरच आनंददायी होतं. भुवी, नट्टू (नटराजन), जयदेव (उनाडकट) हे चांगले खेळाडू आहेत. संघात तरुण प्रतिभाही भरपूर होती. सपोर्ट स्टाफ अप्रतिम होता. आमच्यासाठी हा सीझन खूप चांगला राहिला.”
आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात केकेआरनं हैदराबादवर 8 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची टीम 18.3 षटकांत 113 धावांवर ऑलआऊट झाली. केकेआरनं 114 धावांचं लक्ष्य 10.3 षटकांत 2 गडी गमावून गाठलं.
महत्त्वाच्या बातम्या –
सुनील नारायणची जादू अन् गौतम गंभीरचा गुरुमंत्र! ‘या’ 5 कारणांमुळे केकेआर 10 वर्षांनंतर बनली चॅम्पियन
सुनील नारायण IPL 2024 चा सर्वात मौल्यवान खेळाडू! तिसऱ्यांदा पुरस्कार जिंकून रचला इतिहास