---Advertisement---

गुजरात टायटन्स विरुद्धच्या पराभवानंतर सनरायझर्स हैद्राबादचे आणखी मोठे नुकसान! वाचा सविस्तर

On: बुधवार, मे 13, 2026 12:01 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (१२ मे) अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद भिडले. यामध्ये यजमान संघाने चमकदार कामगिरी करत हैद्राबादचा विक्रमी पराभव केला. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हैद्राबादच्या कर्णधाराला शिक्षा सुनावली आहे. सामन्यादरम्यान षटकांचा वेग कमी ठेवल्याने पॅट कमिन्स दोषी आढळला आणि त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कमिन्स आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत दोषी आढळला आणि हंगामातील हा त्याचा पहिलाच गुन्हा असल्याने त्याच्याकडून दंड आकारला गेला.

सामन्याची स्थिती पाहिली तर, हैद्राबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. साई सुदर्शनने त्याच्या लयीत सातत्या राखत पुन्हा एकदा चांगली खेळी करत संघाला उत्तम सुरूवात करून दिली. त्याने ४४ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ६१ धावा केल्या. कर्णधार शुबमन गिल (५) आणि जोस बटलर (७) लवकर बाद झाल्यानंतर संघ अडचणीत आला होता, मात्र वॉशिंग्टन सुंदरने ३३ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ५० धावा केल्या. त्यामुळे गुजरातने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १६८ धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात हैद्राबादची फलंदाजी फळी लवकरच उद्ध्वस्त झाली, त्यामागचे कारण गुजरातची धमाकेदार गोलंदाजी. ट्रेविस हेड (०), अभिषेक शर्मा (६), इशान किशन (११), स्मरण रविचंद्रन (९) आणि हेनरिच क्लासेन (१४) हे स्वस्तात बाद झाले. एकवेळ त्यांची स्थिती १०.४ षटकांत ७ बाद ६० धावा अशी झाली होती. त्यानंतरही कोणीच चांगली कामगिरी केली नाही आणि हैद्राबाद १४.५ षटकांत ८६ धावा करत सर्वबाद झाला.

गुजरातकडून कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने २ विकेट्स, तर मोहम्मद सिराज आणि राशीद खान यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

या सामन्याच्या निकालानंतर गुजरात गुणतालिकेत पहिल्या तर हैद्राबाद तिसऱ्या स्थानी आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---