वुमेन्स बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात अशी काहीतरी घटना घडत आहे, ज्याचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. रविवारी (१७ ऑक्टोबर) पर्थ स्कॉर्चर्स आणि ब्रिस्बेन हिट या दोन्ही संघामध्ये रंगतदार सामना पहायला मिळाला होता. या सामन्यात देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे, ज्यामुळे हा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला होता.
या सामन्यात ब्रिस्बेन हिट संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना पर्थ स्कॉर्चर्स संघाकडून बेथ मुनीने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तर क्लो पिपारोने २० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर पर्थ स्कॉर्चर्स संघाला २० षटक अखेर ७ बाद १३७ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना, ब्रिस्बेन हिट संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवण्यासाठी १० धावांची आवश्यकता होती. तर शेवटचे षटक टाकण्यासाठी लीली मिल्स गोलंदाजीला आली होती. तिने सुरुवातीच्या ३ षटकात अवघ्या १९ धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी तिला देण्यात आली होती.
मिल्सला पहिल्याच चेंडूवर नदीनडी क्लर्कने चौकार मारला होता. त्यानंतर पुढील तिसऱ्या चेंडूवर मिल्सने पुनरागमन करत फलंदाजाला बाद केले होते. त्यानंतर ब्रिसबेन हिट संघाला विजयासाठी ३ चेंडूंमध्ये ४ धावांची आवश्यकता असताना फलंदाजाने १ धाव घेतली होती. मात्र त्यापुढील चेंडूवर पुन्हा अजून एक विकेट पडली. शेवटी ब्रिस्बेन हिट संघाला हा सामना जिंकण्यासाठी १ चेंडूंमध्ये ३ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी फलंदाजाने मिड ऑनच्या दिशेने शॉट खेळला. तो चेंडू क्षेत्ररक्षकाने काही सेकंदात उचलून गोलंदाजाकडे फेकला.
त्यावेळी फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होती. परंतु क्षेत्ररक्षकाने फेकलेला हा थ्रो गोलंदाजाला पकडता आला नाही आणि त्यांनी दुसरी धाव पूर्ण केली. अशाप्रकारे हा सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हरमध्ये हा सामना पर्थ स्कॉर्चर्स संघाने आपल्या नावावर केला आहे. जर गोलंदाज मिल्सने आळस न करता त्वरित चेंडू पकडला असता तर सामन्याचा निकाल काही वेगळाच असता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बाबा, यापूर्वी तुम्हाला असं कधीच पाहिलं नाही’, अश्विनला निळ्या जर्सीत पाहून लेकही झाली चकित
टी२० विश्वचषक २०२१: भारत आणि पाकिस्तान संघांची ‘सार्वकालिन प्लेइंग इलेव्हन’, धोनी संघनायक तर…
आज भिडणार भारत आणि इंग्लंड संघ, प्लेइंग इलेव्हनसहित जाणून घ्या सामन्याबद्दल संपूर्ण माहिती






