क्रिकेट जगात पुरुषांच्या वरिष्ठ वयोगटासाठी आता तीन वेगवेगळे विश्वचषक खेळवले जातात. ५० षटकांचा, २० षटकांचा व आता नव्यानेच सुरु झालेली कसोटी चॅंम्पियनशीप असे हे तीन विश्वचषक.
जेव्हा कोणताही देश विश्वचषकासाठी तयारी करत असतो, तेव्हा त्यांच्या मैदानावरील तयारीबरोबर त्यांच्या प्रत्यक्ष सामन्यात घालण्याच्या जर्सीची व सरावासाठी वापरण्यात येणाऱ्या जर्सीचीही अशीच चर्चा असते. संघाचे जर्सी स्पाॅन्सर्स यासाठी अतिशय खास असे डिजाईन तयार करतात. ही जर्सी चाहत्यांच्याही सदैव स्मरणात राहते.
१८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०१२ दरम्यान आयसीसीने टी२० विश्वचषकाचे आयोजन श्रीलंका देशात केले होते. आयसीसीचा हा चौथा टी२० विश्वचषक होता. या विश्वचषकापुर्वी बरोबर एक महिना आधी म्हणजे १६ ऑगस्ट २०१२ रोजी नाईके कंपनीने तिरंग्याचा रंग एका खांद्याला झलक असलेली निळ्या रंगातील खास जर्सीचे मुंबईत अनावरण केले.
या कार्यक्रमासाठी कर्णधार एमएस धोनी, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, इरफान पठाण, रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे हे दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. या जर्सीत भारतीय संस्कृती व भारतीय क्रिकेटची संस्कृती यांचा मिलाप करुन डिजाईन केल्याचा दावा नाईकेने केला होता. तिरंगा कलर हा खेळाडूंच्या हृदयाजवळ सतत असेल व त्यांना सतत तो प्रेरणा देईल असेही तेव्हा नाईकेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते. तसेच ही जर्सी आधीच्या जर्सीपेक्षा जवळपास ४५ टक्के कमी वजनाची होती. यात अनेक तांत्रिक बाबींवर नाईकेने काम केले होते.
Nike unveils Team India's new T20 jersey. #bleedblue pic.twitter.com/9E3c5dv4
— BCCI (@BCCI) August 16, 2012
यानंतर ही जर्सी लगेच होतं असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही वापरण्यात येणार होती. या अनावरणाच्या कार्यक्रमावेळी तेव्हाचे बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी जर्सीच्या डिजाईनचे कौतूक करताना संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. तसेच विराट कोहली, एमएस धोनीसह सर्वच खेळाडू या जर्सीच्या प्रेमात पडले होते. त्यांनी जर्सी खूप सुंदर असल्याची प्रतिक्रिया तेव्हा दिली होती.
परंतु त्यानंतर कुठे माशी शिंकली कळले नाही. परंतु भारतीय संघाने २०११ क्रिकेट विश्वचषकात घातलेली जर्सीच पुन्हा २०१२ टी२० विश्वचषकात वापरली. तेव्हा माध्यमांमध्ये आलेल्या काही वृत्तानुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष असलेले एन श्रीनिवासन हे अंधश्रद्धाळू असल्याने हा निर्णय झाल्याचे सांगितले होते. तसेच तेव्हा श्रीनिवासन यांचा बीसीसीआयवर एकहाती अंमल होता. त्यांनी नाईक कंपनीला २०११ विश्वचषकामध्ये वापरलेलीच जर्सी पुन्ही टी२० विश्वचषकासाठी डिजाईन करायला सांगितली.
यावर नाईकने म्हटले होते की, निर्णय घेण्याचे काम ते (बीसीसीआय) करते व त्यांनी आम्हाला जर्सी बदलण्यास सांगितले आहे.
तर श्रीनिवासन यांनी सांगितले होते की, आमच्याकडे जर्सीसाठी खूप पर्याय होते व आम्ही यातील जुन्या वापरलेल्या जर्सीचाच वापर विश्वचषकात करणार आहोत. यात विशेष सांगण्यासारखं काही नाही.
तेव्हा काही माध्यमांमध्ये असेही वृत्त होते की, श्रीनिवासने हे प्रचंड अंधश्रद्धाळू आहेत. ते २०११मध्ये भारतीय संघ जिंकला, तशीच कामगिरी पुढे कायम ठेवावी म्हणून जुन्याच जर्सीचा विचार करत आहेत. तसेच त्यांच्या प्रत्येक निर्णयापुर्वी ते वास्तु वेंकटेस्वरन या व्यक्तीचा सल्ला घेतात. त्यांनीचे चेपाॅक स्टेडियम शेजारी गणपतीचे मंदीर देखील बांधले होते. तसेच गणपतीची आपल्या टीएनसीएवर यामुळे सतत कृपा राहिल, असा त्यांना विश्वास होता.
२०१२ टी२० विश्वचषकात भारतीय संघ सेमीफायनलमध्येही गेला नाही, ही गोष्ट मात्र वेगळीच.