प्रो – कबड्डीमध्ये यंदा चार नवीन संघ दाखल झाले. त्यातील एक संघ म्हणजे हरयाणा स्टीलर्स. हरयाणा स्टीलर्स संघाचे नेतृत्व सुरिंदर नाडा याच्याकडे आहे. सुरिंदर नाडा हा भारतीय संघातला नियमितचा लेफ्ट कॉर्नर खेळाडू आहे. प्रो कबड्डीमध्ये सुरिंदर पाचवा सर्वात यशस्वी डिफेंडर आहे.
या मोसमात नवीन संघाचा कर्णधार झाल्यापासून सुरिंदर नाडाचा खेळ भलताच बहरला आहे. या मोसमात खेळलेल्या चारही सामन्यात त्याने हाय ५ मिळवला आहे. अशी कामगिरी करणारा या मोसमातील तो पहिला खेळाडू ठरला आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रात खेळताना हाय ५ मिळवणारा देखील सुरिंदर या मोसमातील पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे.
पहिल्या सामन्यात यु मुंबा विरुद्ध खेळताना ५ गुण, दुसऱ्या सामन्यात गुजरात विरुद्ध खेळताना ७ गुण केले. तिसऱ्या सामन्यात गुजरात पुन्हा चांगली कामगिरी करत ६ गुण, चौथ्या सामन्यात तमीळ संघाविरुद्ध खेळताना ७ गुण अशी उत्तम कामगिरी सुरिंदरने केली आहे.
सर्वाधीक हाय ५ करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरिंदर हा मंजीत चिल्लर (१७), मोहीत चिल्लर (१६) यांच्यानंतर सुरिंदर (१४) ‘हाय ५’ सह तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधीक गुण मिळवणाऱ्या डिफेंडरच्या यादीत १६२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत मंजीत चिल्लर २०६ गुणांसह पहिल्या तर १७८ गुणांसह सुरिंदरचा सहकारी मोहीत चिल्लर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हाय ५ म्हणजे नेमके काय ?
– एका सामन्यात जेव्हा खेळाडू डिफेन्समध्ये ५ किंवा त्यापेक्षा ज्यात गुण मिळवतो त्याला ‘हाय ५’ म्हणतात.