आयपीएल २०२२मधून मोठी बातमी समोर येत आहे. ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना आणि भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आयपीएलच्या १५ व्या हंगामात नवीन अवतारात दिसणार आहेत. पहिल्या सत्रापासून आयपीएल २०२१पर्यंत आयपीएलचा भाग राहिलेल्या सुरेश रैनाला यावेळी आयपीएल लिलावात एकाही संघाने आपल्या ताफ्यात सामील केले नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघावर टीकेची झोड उडाली होती. कारण, आतापर्यंत रैना आयपीएलमध्ये फक्त चेन्नई आणि गुजरात लायन्स संघाकडूनच खेळला आहे.
चेन्नई (Chennai Super Kings) संघावर २ वर्षांसाठी बंदी आल्यानंतर रैनाने (Suresh Raina) गुजरात लायन्स (Gujrat Lions) संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. यानंतर तो पुन्हा चेन्नई संघात सामील झाला. दुसरीकडे चाहत्यांनाही अपेक्षा होती की, उत्तर प्रदेशचा असल्यामुळे आयपीएलचा नवीन संघ लखनऊ सुपर जायंट्स त्याला आपल्या ताफ्यात घेईल. मात्र, या संघानेही त्याला लिलावात विकत घेतले नाही. मात्र, आता तो जगातील सर्वात मोठ्या टी२० लीगमध्ये यावर्षी खेळाडू म्हणून खेळताना नाही, तर स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना दिसणार आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकाचे पद सोडल्यानंतर रवी शास्त्रीही आयपीएलमध्ये पहिल्यांदा हिंदीत कॉमेंट्री करताना दिसणार आहेत.
आयपीएलशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, ‘तुम्हा सर्वांना माहित आहे की, रैना यावेळी आयपीएलमध्ये खेळणार नाही. मात्र, आम्हाला त्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडायचे होते. त्याला मिस्टर आयपीएल म्हणतात. तो एकेकाळी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याचे लाखो चाहते आहेत. त्याच वेळी शास्त्री स्टार स्पोर्ट्ससाठी पूर्वी इंग्रजीत समालोचन करायचे. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर रवी शास्त्री यांनी समालोचन केले नाही. ते भारतीय संघात मुख्य प्रशिक्षक म्हणून सामील झाले होते.
विशेष म्हणजे, शास्त्री यावेळी इंग्रजीत नाहीत, तर हिंदीत समालोचन करणार आहेत. सूत्राने सांगितले की, ‘शास्त्री यांच्या हिंदीमध्ये मुंबईपणा जास्त आहे. त्यामुळे ते झूमवर आमच्या शिक्षकांकडून हिंदीचे वर्गही घेत आहेत. त्यांना काही नोट्सही पाठवल्या जात आहेत. काही समालोचन रिहर्सलही केल्या आहेत.’ ‘एकंदरीत, त्यांच्याकडील बोलण्याची शैली कायम राहावी आणि त्यांनी उत्तम हिंदीही बोलावे, जी प्रेक्षकांना आवडेल,’ असे आम्हाला वाटते.
सनी-रवी जोडी नाही ठरली
सुनील गावसकर आणि रवी शास्त्री पुन्हा एकदा एकत्र समालोचन करताना दिसणार का, असे जेव्हा सूत्राला विचारण्यात आले, तेव्हा उत्तर मिळाले की, अद्याप निर्णय झालेला नाही. गावसकर हिंदी समालोचनातही असतील, पण एक टीम बायो-बबलमध्ये असेल. तेच समालोचक मैदानात उतरतील, तर समालोचकांची दुसरी टीम आमच्या स्टुडिओत राहील. आता या दोघांची जोडी एकत्र येणार की नाही हे पाहावं लागेल.