आयपीएल २०१८ दोन दिवसात सुरु होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच आयपीएलचे वेध लागले आहेत. आयपीएलमध्ये नेहमीच धावांची खैरात तर चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. तर कधी गोलंदाज भाव खाऊन जातात. पण या सगळ्यात एक खास विक्रम सुरेश रैनाने आपल्या नावावर केला आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना आयपीएल इतिहासात असा एकमेव खेळाडू आहे, ज्याने तीन देशात आयपीएलचे सामनावीर पुरस्कार मिळवले आहेत. यात त्याने भारत, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या तीन देशात सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.
भारतातील लोकसभा निवडणुकांमुळे २००९ आणि २०१४ मध्ये आयपीएल दुसऱ्या देशात हलवले गेले होते. यात २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचा संपूर्ण दुसरा मोसम पार पडला, तर २०१४ मध्ये आयपीएलच्या ७ व्या मोसमाचा पहिला टप्पा संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये पार पडला.
रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडूही आहे. त्याला यावर्षी चेन्नईने लिलावाआधीच संघात कायम केले आहे. मागील दोन वर्षे तो चेन्नई संघावर असलेल्या बंदीमुळे गुजरात लायन्स संघाकडून खेळला. तसेच त्याने गुजरात संघाचे नेतृत्वही केले.