भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू व कर्णधार सुरेश रैना याला मुंबईत अटक करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते. मुंबई विमानतळाजवळील ड्रॅगनफ्लाय क्लबवर छापा टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यात आले आहे. जामीन मिळाल्यानंतर आता रैनाने त्या घटनेविषयी स्पष्टीकरण दिले आहे. रैनासह आणखी ३३ जणांना अटक केली गेली होती.
मुंबईतील क्लबमध्ये अटक केल्यानंतर रैनाला त्वरेने जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर रैनाने प्रतिक्रिया देताना, सदर घटनेविषयी माहिती दिली. रैना म्हणाला, “मी मुंबईमध्ये एका चित्रीकरणाच्या निमित्ताने आलो होतो. चित्रीकरणास उशीर झाल्याने एका मित्राने मला जेवणासाठी आमंत्रित केले. त्यानंतर मी दिल्लीला रवाना होणार होतो. मला मुंबईतील स्थानिक वेळ आणि प्रोटोकॉल याबाबत काहीही माहिती नव्हती. या घटनेनंतर मी अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी सांगितलेल्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली. मी स्वतः कायम सरकारी नियमांचे पालन करत आलो आहे आणि करत राहील.”
रैनासह बऱ्याच सेलिब्रिटींना झाली होती अटक
या प्रकरणात रैनासह गायक गुरु रंधावा, सुजान खान, बादशाहा असे काही सेलिब्रेटीही या क्लबमध्ये असल्याचे उघडकीस येत आहे. मुंबई पोलीसांनी या सर्व प्रसिद्ध व्यक्तींसह एकूण ३४ जणांना आयपीसीच्या कलम १८८, २६८ व ३४ अंतर्गत आणि एनएमडीएच्या तरतुदींनुसार ताब्यात घेतले होते. परवानगी असलेल्या वेळेपेक्षा अधिकवेळ क्लब चालू ठेवण्याबद्दल आणि कोविड नियमांचे उल्लंघन करत असल्याने ड्रॅगनफ्लाय क्लबवर छापा टाकण्यात आला होता. हा छापा मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास टाकला असल्याचेही उघड होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे रैना
सुरेश रैनाने याचवर्षी एमएस धोनीसह १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय १८ कसोटी, २२६ वनडे व ७८ टी२० सामने खेळले असून २०११ विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. तसेच रैनाने यावर्षीच्या आयपीएलमधूनही माघार घेतली होती. यादरम्यान तो काही सामाजिक कार्य करताना पाहायला मिळालेला. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत तो उत्तर प्रदेशचे प्रतिनिधीत्व करेल.
महत्वाच्या बातम्या:
– शुभमंगल सावधान! फिरकीपटू युझवेंद्र चहलची विकेट पडली, धनश्री वर्मासोबत बांधली लगीनगाठ
– बिग ब्रेकिंग! क्रिकेटपटू सुरेश रैनाला मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल
– मोहम्मद रिझवानचे दमदार अर्धशतक; तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानने व्हाईटवाॅश टाळला