सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेची सुरुवात 8 नोव्हेंबरपासून डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यानं झाली. हा सामना टीम इंडियानं 61 धावांनी जिंकला. मात्र दुसऱ्या सामन्यात ‘मेन इन ब्लू’ला 3 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवाचं कारण कर्णधार सूर्यकुमार यादवनं घेतलेला एक निर्णय होता.
वास्तविक, सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. टीम इंडियानं 20 षटकं फलंदाजी केल्यानंतर 6 गडी गमावून 124 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य छोटं होतं, मात्र वरुण चक्रवर्तीच्या घातक गोलंदाजीमुळे सामन्याचा रोमांच वाढला. चक्रवर्तीनं 4 षटकात केवळ 17 धावा देत पाच विकेट घेतल्या. एकवेळ 86 च्या धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेच्या 7 विकेट पडल्या होत्या आणि भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं.
या वेळेपर्यंत रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांच्या फिरकी गोलंदाजीनं दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखलं होतं. परंतु अक्षर पटेलच्या रूपानं तिसरा फिरकी गोलंदाजीचा पर्याय असतानाही सूर्यानं त्याला गोलंदाजी दिली नाही. त्यानं अर्शदीप सिंग आणि आवेश खानला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला, जो संघाच्या पराभवाचं कारण ठरला. ट्रिस्टन स्टब्स आणि जेराल्ड कोएत्झी यांनी वेगवान गोलंदाजांविरुद्ध सहजतेनं मोठे फटके खेळले आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेलं. अक्षर पटेलनं या सामन्यात फक्त एकच षटक टाकलं. अक्षरला गोलंदाजी न देण्याचा निर्णय सर्वांच्याच समजण्यापलीकडचा आहे.
या सामन्यात भारतीय फलंदाजानी निराशाजनक कामगिरी केली. संजू सॅमसन (0), अभिषेक शर्मा (4), सूर्यकुमार यादव (4), तिलक वर्मा (20), रिंकू सिंह (9) हे स्टार फलंदाज सपशेल फ्लॉप ठरले. हार्दिक पांड्यानं 45 चेंडूत केलेल्या नाबाद 39 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 6 गडी गमावून 124 धावा करण्यात यश मिळालं.
प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेनं हे लक्ष्य 19 षटकांत 7 गडी गमावून गाठलं आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता मालिकेतील तिसरा सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे.
हेही वाचा –
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑडिशन देतोय? टी20 मध्ये कसोटीप्रमाणे खेळला हार्दिक पांड्या
वरुण चक्रवर्तीची शानदार कामगिरी वाया, रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी भारताला मोठा झटका! रोहित शर्मा बाहेर