---Advertisement---

सूर्याचं ग्रहण संपलं… 2025 मध्ये वर्षभरातील धावा अवघ्या 5 सामन्यांतच ठोकल्या

On: रविवार, फेब्रुवारी 1, 2026 1:55 PM
---Advertisement---

भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी 2025 हे वर्ष अक्षरशः खूप कठीण गेले. संपूर्ण वर्षभरात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक निघाले नाही. तब्बल 23 डावांपर्यंत सूर्या पन्नाशीचा टप्पा गाठू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका सुरू झाली होती. “संघात जागा मिळणंच कठीण असताना तो नेतृत्व कसं करतो?” असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, या सगळ्या टीकेला सूर्यकुमार यादवने शांतपणे आणि हसत उत्तर दिलं. प्रत्येक पत्रकार परिषदेत तो नम्रपणे सांगत राहिला की, तो आउट ऑफ फॉर्म नाही, फक्त धावा जमत नाहीयेत.

आकडेवारी पाहिली तर 2025 मध्ये सूर्या खरंच अडचणीत होता. त्याने मागील वर्षी 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, पण केवळ 218 धावाच करू शकला. त्याचा स्ट्राइक रेट चांगला राहिला, मात्र सरासरीत मोठी घसरण झाली होती. त्यामुळे सूर्यासाठी 2025 हे वर्ष विसरण्यासारखं ठरलं.

मात्र 2026 सुरू होताच चित्र पूर्णपणे बदललं. टी20 वर्ल्ड कपपूर्वीच सूर्यकुमार यादवने आपल्या बॅटने जोरदार पुनरागमन केलं. न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत सूर्या पूर्णपणे वेगळ्याच रंगात दिसला. विशेष म्हणजे, 2025 मध्ये संपूर्ण वर्षभरात जितक्या धावा तो करू शकला नव्हता, त्याहून अधिक धावा त्याने 2026 मधील अवघ्या पाच सामन्यांत केल्या. या मालिकेत सूर्यकुमार यादवने पाच डावांत तब्बल 242 धावा केल्या आणि ‘प्लेअर ऑफ द सीरिज’चा मानही पटकावला.

या मालिकेत फक्त दोनच फलंदाज 200 धावांचा टप्पा ओलांडू शकले, त्यामध्ये सूर्यकुमार यादवसोबत ईशान किशनचा समावेश होता. पाचव्या आणि अंतिम टी20 सामन्यात सूर्यानं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 3000 धावांचाही टप्पा गाठला. कर्णधार म्हणून 1000 टी20 धावा पूर्ण करण्यासाठी तो केवळ 10 धावांनी कमी पडला, पण फॉर्म पाहता हे विक्रम लवकरच पूर्ण होईल, यात शंका नाही.

टी20 वर्ल्ड कपच्या तोंडावर सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये येणं ही भारतीय संघासाठी अतिशय दिलासादायक बाब आहे. सध्या भारतीय फलंदाजी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत आहे. मात्र, वेगवान गोलंदाजांच्या महागड्या षटकांमुळे थोडी चिंता आहे. फिरकी गोलंदाजांनी मात्र जबाबदारी उचलली आहे. आता 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया काय कमाल दाखवते, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---