आजकाल अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपला सर्वकालिन संघ जाहीर करताना दिसतात. नुकताच भारतीय आणि मुंबई इंडियन्स संघातील फलंदाज सूर्यकुमार यादवनेही आपला आयपीएलचा सर्वकालिन ११ जणांचा संघ घोषित केला आहे. त्यानं त्याच्या संघात आयपीएलमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक एमएस धोनीला स्थान दिलेले नाही.
सूर्यकुमारने क्रिकबजशी बोलताना त्याचा आयपीएलचा सर्वकालिन ११ जणांचा संघ निवडला. त्याने त्याच्या या संघात स्वत:लाही स्थान दिले असून विराट कोहली आणि एबी डिविलियर्सचाही त्याने समावेश केला आहे. सुर्यकुमारने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याच्या संघात जोस बटलरला स्थान दिले आहे. तसेच सलामीला रोहित शर्मासह बटलरचीच निवड त्याने केली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर त्याने विराट कोहलीला ठेवले आहे. तर स्वत:साठी त्याने फलंदाजी क्रमवारीत चौथा क्रमांक निवडला आहे. डिविलियर्सला त्याने पाचवा क्रमांक दिला आहे.
याशिवाय सूर्यकुमारने त्याच्या संघात अष्टपैलू हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि आंद्रे रसल यांनाही स्थान दिले आहे. त्याचबरोबर फिरकीपटू म्हणून सूर्यकुमारने राशिद खानला निवडले असून वेगवान गोलंदाजांच्या फळीत त्याने मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहची निवड केली आहे.
सूर्यकुमारला आयपीएलचा दांडगा अनुभव असून त्याने आत्तापर्यंत १०८ आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९.६८ च्या सरारीने १२ अर्धशतकांसह २१९७ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार सध्या भारतीय संघासह श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. या दौऱ्याला १८ जुलैपासून वनडे सामन्याने सुरुवात होईल.
सूर्यकुमार यादवचा आयपीएलचा सर्वकालिन ११ जणांचा संघ –
जोस बटलर (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एबी डिविलियर्स, हार्दिक पंड्या, आंद्रे रसल, रविंद्र जडेजा, राशिद खान, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्यावेळी मी झहीरला शिव्या दिल्या की मला सलामीवीर बनवलं, पण आज…’, सेहवागने केला खुलासा