इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आमने-सामने येतील. या मालिकेसाठी भारतीय संघाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली. या संघात तब्बल बारा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईच्या सूर्यकुमार यादवला स्थान मिळाले.
गेले काही वर्षे सातत्याने स्थानिक क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये देखील सातत्याने दमदार कामगिरी करूनही सूर्यकुमारला भारतीय संघात संधी मिळत नव्हती. मागील वर्षी देखील आयपीएल सुरु असतांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय संघाची निवड झाली होती आणि त्यात त्याचे नाव नव्हते. ही निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध खेळतांना भारताचा व बंगलोरच्याही संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीसोट त्याची झालेली नजरानजर चर्चेचा विषय ठरली होती.
सूर्यकुमारची भारतीय संघात निवड न झाल्याने त्याचे नैराश्यच त्या नजरानजरीच्या प्रकरणात दिसून आल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले होते. मात्र आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हे दोघेही भारतीय संघात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून खेळतांना दिसतील. याबाबत सूर्यकुमारने नुकतीच प्रतिक्रिया दिली.
विराट कोहलीसह खेळण्याबाबत तो म्हणाला, “मी भारतीय संघात निवड होताच इतर दिग्गज खेळाडूंसोबत कसे राहायचे, याचा विचार सुरु केला होता. मला कर्णधार विराट कोहलीकडून अनेक गोष्टी नक्कीच शिकायला मिळतील. तसेच रोहित शर्मा आणि इतरही अनेक खेळाडू भारतीय संघात आहेत.”
आयपीएलच्या दरम्यानच भारताकडून खेळण्याच स्वप्न पाहायला सुरु केल्याचे सूर्यकुमार याने यावेळी सांगितले. तो म्हणाला, “आयपीएल दरम्यान असे अनेक क्षण आले ज्यावेळी मी भारतासाठी सामना जिंकवून देण्याचे स्वप्न पाहत असे. माझ्या मते मला अतिशय योग्य वेळी संधी मिळाली आहे. आता मी या संधीचा कसा फायदा घेईल, हे पूर्णपणे माझ्या हातात आहे.”
महत्वाच्या बातम्या:
डबल धमाका! अहमदाबाद कसोटीत द्विशतक झळकावणारे ५ धुरंधर, तिघे आहेत भारतीय
केरळ एक्सप्रेस सुसाट! लिलावात दुर्लक्ष केल्यानंतर श्रीसंतचा बळींचा पंचक, फ्रँचायझींना सणसणीत चपराक