भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गुरुवारी (१८ मार्च) पार पडलेला चौथा टी२० सामना भारताने ८ धावांनी जिंकला आणि मालिकेत २-२ ने बरोबरी साधली. या अटीतटीच्या सामन्यात भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध चौफेर फटकेबाजी केली. त्यातही वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला त्याने धू धू धुतले. सामन्यानंतर आता सूर्यकुमारने आर्चरविरुद्धच्या रणनितीचा खुलासा केला आहे.
त्याचे झाले असे की, सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी गोलंदाजी करत असलेल्या आर्चरने १४३.९ किलोमीटर दर ताशी वेगाने चेंडू टाकला. मात्र सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपल्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार मारत सर्वांना अवाक् केले.
जोफ्रा आर्चरविरुद्ध केली होती खास तयारी
सामन्यानंतर शार्दुल ठाकूरने सूर्यकुमारची मुलाखत घेतली. यावेळी त्याने सूर्यकुमारला प्रश्न विचारला की, आर्चरसारखा गोलंदाज पुढे असताना पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याइतकी हिम्मत कुठून आली?
यावर उत्तर देताना सूर्यकमार म्हणाला की, “ज्याप्रकारे गोष्टी घडत गेल्या, त्याने वास्तवात मी खूप खुष आहे. जेव्हा मी फलंदाजीसाठी मैदानावर उतरलो होतो, तेव्हा माझी रणनिती स्पष्ट होती. मी आर्चरला मागील २-३ आयपीएल हंगामांपासून पाहात आलो आहे. मी त्याने सर्व आयपीएल सामने पाहिले आहेत. त्यामुळे मला माहिती होते की, नवख्या फलंदाजाविरुद्ध त्याची रणनिती काय असेल. त्याच हिशोबाने मी माझी तयारी केली होती.”
https://twitter.com/BCCI/status/1372780728140718085?s=20
पहिल्याच सामन्यात सोडली छाप
३० वर्षीय सूर्यकुमारला दुसऱ्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली होती. परंतु मधल्या फळीत जागा देण्यात आल्याने त्याला या सामन्यात फलंदाजी करायला मिळाली नाही. अखेर चौथ्या टी२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीने आपल्या तिसऱ्या स्थानी सूर्यकुमारले फलंदाजीस पाठवले.
यावेळी ३१ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने ५७ धावांची अफलातून खेळी केली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG: मालिका विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक; निर्णायक पाचव्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही
अफगाणिस्तानच्या कर्णधारानं घडवला इतिहास; ‘कॅप्टनकूल’ धोनीच्या विश्वविक्रमाची केली बरोबरी






