बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग २०२१ ची प्रतिक्षा आता जवळ जवळ संपली आहे. आज (०९ एप्रिल) चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात हंगामाचा पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यात दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार असल्याने चाहत्यांचे पैसावसूल मनोरंजन होणार आहे. तत्पुर्वी मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने कर्णधार रोहित शर्मा याच्याविषयी मोठा उलगडा केला आहे.
एका मुलाखतीत सूर्यकुमारने रोहितच्या यशामागील रहस्य सांगितले आहे. इतर कर्णधारांच्या तुलनेत रोहितमधील वेगळेपणाचा त्याने खुलासा केला आहे.
सूर्यकुमार यादवने सांगितली रोहित शर्माची विशेषता
सूर्यकुमार म्हणाला की, “रोहित कमालीचे काम करत आहेत. त्याची कामगिरी कोणापासूनही लपून राहिलेली नाही. त्याने मुंबई इंडियन्स संघाला तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. रोहित मैदानावर जसा दिसतो मैदानाबाहेर अगदी तो याउलट भूमिकेत दिसतो. मैदानावर त्याला परस्थितींवर नियंत्रण ठेवताना आपण सर्वांनी पाहिले आहे. परंतु तो मैदानाबाहेर यापेक्षाही जास्त परफेक्ट आहे. त्याचा स्वभाव अतिशय विनोदी आहे. त्याच्या याच स्वभावामुळे संघ सहकारी त्याच्याशी लवकर जोडले जातात. त्याच हीच बाब त्याला इतरांपेक्षा वेगळी बनवते. ”
मुंबई इंडियन्सने आयपीएलचा श्रीगणेशा करण्याची आठवी वेळ
विशेष म्हणजे, यावेळी आठव्यांदा मुंबई संघ आयपीएल हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. याआधी त्यांनी २००९, २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१८ आणि २०२० या सात हंगामात पहिला सामना खेळला होता. यातील २००९ मध्ये ते गुणतालिकेत सातव्या, २०१२ ला तिसऱ्या, २०१४ ला चौथ्या स्थानावर राहिले होते. तर २०१५ ला त्यांनी विजेतेपद मिळवले होते. याबरोबरच २०१६ आणि २०१८ मध्ये ते ५ व्या क्रमांकावर राहिले. तसेच २०२० साली त्यांनी आयपीएलचे ५ वे विजेतेपद जिंकले.
आता पुन्हा एकदा मुंबईचा संघ यावेळी आयपीएल हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. पण त्यांचा याआधीचा हंगामातील पहिला सामना खेळण्याचा इतिहास पाहाता तो काही खास राहिलेला नाही. त्यांना केवळ दोनदाच विजेतेपद मिळवता आले आहे. त्यामुळे आता या हंगामात ते कशी कामगिरी करणार? हे पहावे लागेल.