भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला टी20 सामना आज (22 जानेवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहेत. भारतीय संघ कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली, तर इंग्लंड संघ जोस बटलरच्या (Jos Buttler) नेतृत्वाखाली मैदानावर उतरणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंच्या निशाण्यावर 3 मोठे रेकाॅर्ड्स कोणते आहेत.? हे आपण जाणून घेऊया.
1) सूर्यकुमार यादव 150 षटकार पूर्ण करू शकतो- या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) निशाण्यावर एक खास रेकाॅर्ड आहे. जर सूर्याने इंग्लंडविरूद्धच्या या सामन्यात 5 षटकार ठोकले, तर तो त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 150 षटकार पूर्ण करेल. सध्या त्याने 78 सामन्यांत 145 षटकार लगावले आहेत. 150 षटकार होताच, तो टी20 मध्ये भारतासाठी अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज बनेल.
2) अर्शदीप सिंग भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनू शकतो- भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) गेल्या काही काळापासून आपल्या कारकिर्दीतील उत्कृष्ट फॉर्ममधून जात आहे. तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने विकेट्स घेत आहे. आतापर्यंत त्याने 60 सामन्यांत 95 विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा रेकाॅर्ड युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) नावावर आहे. अर्शदीप चहलच्या 96 विकेट्सपासून 2 विकेट्स दूर आहे.
3) षटकारांच्या बाबतीत संजू सॅमसन धोनीला मागे टाकू शकतो- पहिल्या टी20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) एक खास रेकाॅर्ड आपल्या नावावर करू शकतो. जिथे तो माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) षटकारांचा रेकाॅर्ड मोडू शकतो. जर त्याने या सामन्यात 7 षटकार मारले तर तो धोनीच्या आंतरराष्ट्रीय टी20 षटकारांच्या संख्येला मागे टाकेल.
संजू सॅमसनने सध्या 37 सामन्यांत 46 षटकार मारले आहेत. तर धोनीने आपल्या कारकिर्दीत 52 षटकार मारले आहेत. यादरम्यान संजू माजी फलंदाज शिखर धवनचा (Shikhar Dhawan) (50 टी20 आंतरराष्ट्रीय षटकार) रेकाॅर्डही मोडू शकतो.
अधिक वाचा-
‘मित्रामुळे भेट झाली, नंतर प्रेमात पडले….’, रिंकू सिंग-प्रिया सरोजची लव्ह स्टोरी खूपच रंजक
सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, टीम इंडिया इतक्या वर्षापासून टी20 मालिकेत अपराजित
IND VS ENG; पहिल्या टी20 मध्ये रिंकू सिंगला संधी मिळणार? या 4 खेळाडूंच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह