पुणे। ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वनप्लेस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात सृष्टी सूर्यवंशी हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम फेरीत सहाव्या मानांकित आर्यन कीर्तने याने सर्वज्ञ सरोदेचा 6-2, 7-5 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. आर्यन हा बिशप्स शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून आदर पुनावाला टेनिस अकादमी व डेक्कन जिमखाना क्लब,मध्ये प्रशिक्षक प्रसनजीत पॉल व नितीन किर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे.
दुहेरीत मुलांच्या गटात स्मित उंद्रे व वरद उंद्रे या अव्वल मानांकित जोडीने वीरेन चौधरी व अथर्व डकरे यांचा 6-3, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात अंतिम लढतीत चौथ्या मानांकित पुण्याच्या सृष्टी सूर्यवंशीने दुसऱ्या मानांकित कोल्हापूरच्या रितिका डावलकरचा 6-3, 2-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. सृष्टी ही केंद्रीय विद्यालय शाळेत शिकत असून ईटेनसिटी टेनिस अकादमीत प्रशिक्षक कपिल किन्नरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दुहेरीत अंतिम फेरीत सृष्टी सूर्यवंशी व रितिका डावलकर या जोडीने रित्सा कोंडकर व काव्या पांडे यांचा 6-0, 2-6, 10-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस सुनील फुलारी, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस अतुल पाटील, ओडीएमटीचे ट्रस्टी डॉ.जयसिंग पाटील आणि डीवायएसपी गायत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओम दळवी ट्रस्टचे ट्रस्टी व स्पर्धा संचालक उमेश दळवी, मारुती राऊत, एमएसएलटीए सुपरवायझर प्रणव वाघमारे व कल्पिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी):
मुले: आर्यन कीर्तने[6] वि.वि.सर्वज्ञ सरोदे 6-2, 7-5;
मुली: सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.रितिका डावलकर[2]6-3, 2-6, 6-3;
दुहेरी: अंतिम फेरी:
मुले:स्मित उंद्रे/वरद उंद्रे[1]वि.वि.वीरेन चौधरी/अथर्व डकरे[2] 6-3, 6-1;
मुली: सृष्टी सूर्यवंशी/रितिका डावलकर[1]वि.वि.रित्सा कोंडकर/काव्या पांडे[2] 6-0, 2-6, 10-7.
महत्त्वाच्या बातम्या –
बेंगलोरला राजस्थानविरुद्ध भोवल्या तीन मोठ्या चुका, ज्यामुळे आयपीएल ट्रॉफीचं स्वप्न पुन्हा भंगलं
IPL Final । ‘उद्या रॉयल संघच जिंकेल फायनल’, राजस्थानच्या गोटातील दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
बटलरने विलियम्सनला मागे टाकलेच, पण आता वॉर्नरचा ६ वर्ष जुना ‘हा’ विक्रमही धोक्यात