भारताचा प्रतिभावान खेळाडू सूर्यकुमार यादव इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. या हंगामात त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याची फलंदाजी आणि सातत्य पाहून क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांनीही त्याचे तोंडभरून कौतुक केले होते. यातच गुरुवारी (5 नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या पहिल्या क्वालिफायार सामन्यात त्याने एका खास विक्रमला गवसणी घातली आहे.
आयपीएल कारकिर्दीतील होता 100 वा सामना
सूर्यकुमार यादवचा हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 100 वा सामना होता. या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकून मोठे विक्रम आपल्या नावावर केले. ही कामगिरी करून ऑस्ट्रेलियाविरूद्ध नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात सामील न केलेल्या निवड समितीलाही त्याने उत्तर दिले आहे. सूर्यकुमार यादवने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 15 सामन्यात 4 अर्धशतकांच्या मदतीने 461 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याने 148.23 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
…अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
दिल्लीविरुद्ध झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यातील खेळीमुळे सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या. त्याने आयपीएल कारकिर्दीतील 100 सामन्यांत 2009 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आयपीएलमध्ये 100 सामने खेळणारा आणि 2000 हून अधिक धावा करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
सन 2012 मध्ये केले होते पदार्पण
उल्लेखनीय आहे की सूर्यकुमार यादवने 2012 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि तेव्हापासून त्याने 135.37 च्या स्ट्राईक रेटने आणि 30.43 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
आतापर्यंत झळकावली 11 अर्धशतके
सूर्यकुमारने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 11 अर्धशतके झळकावली आहेत, त्यापैकी 4 या हंगामात केले आहेत. त्याने आयपीएल 2018 मध्ये 14 सामन्यात 512 धावा केल्या होत्या, तर गेल्या हंगामात त्याने 16 सामन्यात 424 धावा केल्या होत्या.