ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारने आज सुवर्णपदक जिंकून भारताला आजच्या दिवसातले दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
त्याने फ्रीस्टाईलमध्ये ७४ किलो वजनी गटात खेळताना अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्स बोथावर १०-० ने मात करत सुवर्णपदकाची कमाई केली.
यामुळे आता भारताच्या खात्यात एकूण २९ पदके झाले आहेत. यात १४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ९ कांस्य पदकांची समावेश आहे. भारत सध्या पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आज सकाळीच भारताला कुस्तीमध्ये आजच्या दिवसातील पहिले सुवर्णपदक मिळाले होते. राहुल आवारेने ५७ किलो वजनी गटात ही सुवर्णमय कामगिरी केली.
सुशील कुमारचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे. याआधी त्याने २०१० च्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात आणि २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते.
तसेच सुशील कुमार हा भारताला दोनवेळा ऑलिंपिक पदके मिळवून देणारा एकमेव खेळाडू आहे. त्याने २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते, तर २०१२च्या लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.