भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सिडनी क्रिकेट ग्राउंडवर टी२० मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी मिळवली होती. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १८६ धावा फटकावल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने दिलेले १८७ धावांचे आव्हान भारताला पेलवले नाही. परिणामी, भारताला १२ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार लेगस्पिनर मिचेल स्वॅपसन ठरला. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर भारताचा हार्दिक पंड्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने टी२० मालिकेत ‘क्लीन स्वीप’ टाळला.
ऑस्ट्रेलियाची शानदार फलंदाजी
मालिकेतील ‘क्लिन स्वीप’ टाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी करताना १८६ धावा धावफलकावर लावल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर-यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने सर्वाधिक ८० धावा फटकावल्या. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक ५४ धावांचे योगदान दिले. भारताकडून वाॅशिंग्टन सुंदरने दोन तर युजवेंद्र चहल आणि टी नटराजनने प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारतीय फलंदाजांची हाराकिरी
ऑस्ट्रेलियाने दिलेले १८७ धावांचे लक्ष पार करताना भारताकडून केएल राहुल व मागील सामन्यात अर्धशतक झळकावलेला शिखर धवन हे सलामीवीर मैदानात उतरले. भारतीय डावाच्या पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मॅक्सवेलने राहुलला स्टीव स्मिथकरवी झेलबाद ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शिखर धवन व कर्णधार विराट कोहली ही जोडी जमली. दोघांनीही काही लाजवाब फटके खेळत भारताची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विराटला यादरम्यान तीन जीवदाने मिळाली. धवन-विराट ही जोडी भारताचा डाव वेगाने पुढे नेत असताना, नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर लेगस्पिनर मिचेल स्वॅपसन याला स्वीप मारण्याच्या प्रयत्नात धवनने डॅनियल सॅम्सच्या हाती झेल सोपवला. सॅम्सने डाव्या हातावर झेप घेत हा अफलातून झेल पकडला. धवनने २८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर, कोहलीने टी२० क्रिकेटमधील आपले २५ वे अर्धशतक पूर्ण केले.
भारतीय संघ सुस्थितीत आल्याचे वाटत असतानाच, बाराव्या षटकात मिचेल स्वॅपसनने ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्याने एकाच षटकात संजू सॅमसन व श्रेयस अय्यर यांना बाद करत भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. स्वॅपसनने चार षटकात २३ धावा देऊन तीन महत्वपूर्ण बळी मिळवले.
कोहलीची एकाकी झुंज
भारताचे इतर फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर अडखळत असताना कर्णधार विराट कोहली दुसऱ्या टोकावरून संघाची धावसंख्या पुढे नेत होता. सॅमसन व श्रेयस बाद झाल्यानंतरही त्याने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. आधी ऍबॉटला एक आणि त्यानंतर डॅनियल सॅम्सला सलग दोन षटकार खेचत धावगती आवाक्याबाहेर जाऊ दिली नाही.
फिंचचे दर्जेदार नेतृत्व
विराट कोहली व हार्दिक पंड्या भारताला विजयाकडे घेऊन जात असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचने जुगार खेळत, अठरावे षटक लेगस्पिनर ऍडम झंपाला टाकण्यासाठी दिले. त्याने पहिल्याच चेंडूवर आक्रमक रूप धारण केलेल्या पंड्याला बाद केले. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर यष्टीरक्षक वेडने विराटला यष्टीचीत करण्याची सोपी संधी दवडली. मात्र, झंपाने किफायतशीर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
एकोणिसाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अँड्र्यू टायने विराटला बाद करत, भारताच्या आव्हानातील हवा काढून टाकली. विराटने ५१ चेंडूत ८५ धावा ठोकल्या. यात ४ चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात २६ धावांचे आव्हान भारताचे वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकुर पूर्ण करू शकले नाहीत आणि भारताला १२ भावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
मर्यादित षटकांच्या मालिका संपल्यानंतर आता उभय संघ १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ खेळतील. मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतेल. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करेल.
संबंधित बातम्या:
– भारतीय संघाची वाढली डोकेदुखी; हा प्रमुख खेळाडू होऊ शकतो पहिल्या कसोटीतून बाहेर
– रडणाऱ्या मुलाला वडील दाखवत होते भारत- ऑस्ट्रेलिया सामना, पाहा गमतीशीर व्हिडिओ
– मालिका जिंकली, अभिनंदन माय, अनुष्का शर्माचा भारतीय संघ अन् विराट कोहलीसाठी खास मेसेज