मुंबई:- स्वराज्य स्पोर्टस् , संघर्ष मंडळ यांनी मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात अनुक्रमे पूर्व व पश्र्चिम विभागात विजेतेपद मिळविले. किशोर गटाच्या पूर्व विभागात स्वस्तिक मंडळाने, तर पश्र्चिम विभागात रत्नदीप कबड्डी संघाने हा मान पटकाविला. मुंबई उपनगर कबड्डी असो.ने संयोजन संस्था, चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर – २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पूर्व विभाग महिलांच्या अंतिम सामन्यात स्वराज्य स्पोर्टस् ने महात्मा फुले स्पोर्टस् चा प्रतिकार ३२-२८ असा मोडून काढत जेतेपद पटकावले. सावध खेळ करीत विश्रांतीला १९-१६ अशी आघाडी घेणाऱ्या स्वराज्यने नंतर देखील संयमाने खेळत आपला विजय साजरा केला. याशिका पुजारी, राधिका सिंग यांच्या कल्पक खेळाला या विजयाचे श्रेय जाते. महात्मा फुलेंच्या निकिता उतेकर, सृष्टी मिश्रा यांनी संघाच्या विजया करीता शर्थीचे प्रयत्न केले. पण ते अयशस्वी ठरले.
याच गटाच्या पश्र्चिम विभागात संघर्ष क्रीडा मंडळाने महात्मा गांधी स्पो. चे कडवे आव्हान २६-२३ असे परतवून लावत विजेतेपद मिळविले. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळाला गेलेल्या या सामन्यात पूर्वार्धात १०-०९ अशी नाममात्र आघाडी संघर्ष संघाकडे होती. उत्तरार्धात देखील चुरस वाढतच गेली. शेवटी ३गुणांच्या फरकाने संघर्ष संघाने बाजी मारली. कोमल देवकर, प्रणाली नागदेवते यांनी संघर्ष कडून, तर करीना कामतेकर, करुणा रासम यांनी महात्मा गांधी कडून चतुरस्त्र खेळ केला. पूर्व विभाग किशोर गटात स्वस्तिक मंडळाने अभिनव मंडळाचा ३५-१८ असा सहज पाडाव करीत अंतिम जेतेपद पटकावले. वंश कदम, आदित्य गुडेकर यांच्या चढाई पकडीच्या खेळाच्या जोरावर स्वस्तिकने पहिल्या डावात १७-०७ अशी आश्वासक आघाडी घेतली. दुसऱ्या डावात संयमाने खेळ करीत विजयाला गवसणी घातली. अभिनवचा सादील यादव चमकला. याच गटाच्या पश्र्चिम विभागात रत्नदीप कबड्डी संघाने जय बजरंग मंडळाला ५२-३३ असे नमवित विजेतेपदाचा मान मिळविला. मध्यांतरालाच ३०-१२ अशी भक्कम आघाडी घेत रत्नदीपने अर्धें काम फत्ते केले होते. अमन सिंग, कृष्णा कानोजिया यांच्या झंझावाती खेळाने हा विजय शक्य झाला. मध्यांतरानंतर जय बजरंगच्या प्रणय वेले, गोविंदा राठोड यांच्या खेळाने सामन्यात थोडी रंगत आली. पण संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.
व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात ब्लॉक हॅक फिल्म संघाने साई श्रद्धा सप्लीमेशन वर ३१-१८ असा विजय मिळवित या गटाचे जेतेपद मिळविले. ओमकार आयरे, गणेश शर्मा यांच्या सुरुवातीच्या आक्रमक खेळाला या विजयाचे श्रेय जाते. साई श्रद्धाचे ओम् तोडणकर, सुधांशू सोळंकी बरे खेळले. द्वितीय श्रेणी पश्र्चिम विभागात वंदे मातरम् मंडळाने संघर्ष मंडळाला ३१-१७ असे पराभूत करीत या गटाचे विजेतेपद मिळविले. पूर्वार्धात १८-१० अशी आघाडी घेणाऱ्या वंदे मातरम् ने उत्तरार्धात देखील त्याच जोशाने खेळ करीत हे जेतेपद मिळविले. सुकेश जगताप, निखिल धामणे या विजयाचे शिल्पकार ठरले. संघर्षाचा जयेश धनावडे बरा खेळला.