मुंबई शहर कबड्डी असो. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने दि. १ ते ४ मार्च २०१९ या कालावधीत आयोजीत व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आज उद्घाटन झाले. महाराष्ट्र राज्य असो.च्या मान्यतेने ना.म.जोशी मार्ग, मुंबई येथील श्रमिक जिमखाना येथे ही स्पर्धा पार पडत आहे.
महिला विभागात स्वराज्य स्पो, उपनगर विरुद्ध होतकरू ठाणे यांच्यात उद्घाटन सामना झाला. स्वराज्य स्पो ने ३५-२० अशी बाजी मारत विजयी सलामी दिली. मध्यंतरा पर्यत २३-०८ अशी भक्कम आघाडी स्वराज्य कडे होती. अंजली रोकडे, यशिका पुजारी, सिद्धी ठाकूर यांनी चांगला खेळ केला. तर दुसऱ्या सामन्यात जय हनुमान बाचणी कोल्हापूर संघाने ३९-२९ असा डॉ. शिरोडकर स्पो संघाच पराभव केला. बाचणीच्या आसावरी खोचरे व पूजा पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला.
राजमाता जिजाई, पुणे संघाने शिवतेज ठाणे संघाचा ४९-१० असा एकहाती पराभव केला. नेहा घाडगे, सायली केरीपले, स्नेहल शिंदे यांच्या आक्रमक खेळासमोर ठाणेच्या खेळाडू निष्पळ ठरल्या. डॉ. शिरोडकर स्पो संघाने दुसऱ्या सामन्यात संघर्ष उपनगर संघाचा ३७-२४ असा पराभव करून आपले आव्हान कायम ठेवले.
पुरुष विभागात देना बँकने बृहन्मुंबई महानगरपालिका संघाचा ३१-१८ असा पराभव करत विजय मिळवला. अनिकेत चिकने व शुभम धनावडे यांनी चांगला खेळ केला. बँक ऑफ इंडिया विरुद्ध न्यु इंडिया इन्शुरन्स यांच्यात झालेल्या सामन्यांत न्यु इंडिया इन्शुरन्स संघाने ३८-१९ अशी बाजी मारली. तर बँक ऑफ इंडियाला दुसऱ्या सामन्यात महिंद्रा अँड महिंद्रा कडून १५-१० असे पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
मुंबई बंदर विरुद्ध सेंट्रल बँक यांच्यात मुंबई बंदरने ४८-१७ असा एकतर्फी विजय मिळवला. मध्यंतरा पर्यत ३४-१० अशी भक्कम आघाडी मुंबई बंदर संघाकडे होती. स्मितील पाटीलच्या आक्रमक चढाया समोर सेंट्रल बँकेची बचावफळी निष्पळ ठरली. मुंबई बंदर कडून अरविंद देशमुख, किरण मगर यांनी चांगला खेळ केला. बृहन्मुंबई महानगरपालिका संघाला युनियन बँक कडून २८-०८ असे पराभवाला सामोरे जावे लागले.