आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि ऑलिम्पिकस्पर्धेसाठी भारताकडून प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविणारा पहिला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे काल शाही थाटात कोल्हापूर येथे विवाह बंधनात अडकला. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असणाऱ्या ऋतूजा भटशी वीरधवल विवाहबद्ध झाला.
ऋतूजा हीसुद्धा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असून तिने अनेक स्पर्धांत भारताचे नेतृत्व केले आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये वीरधवलने भारताचे नेतृत्व केले होते. केंद्रशासनाने त्याला २०१० साली अर्जुन पुरस्कारने सन्मानित केले.
ठरल्याप्रमाणे कोल्हापूर शहरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये या दोन खेळाडूंचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाहसोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यात राजकीय, क्रिडा, सामाजिक तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
वीरधवल सध्या मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असलेल्या ऋजुताशी सहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये वीरधवलची ओळख झाली होती.
विवाहासाठी भारताचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संदीप शेजवाल, अखिल भारतीय जलतरण संघटनेचे अध्यक्ष प्रदीप कुमार, सचिव कमलेश नानावटी. वीरधवलचे बेंगळुरु येथील प्रशिक्षक निहार अमीन, कोल्हापुरातील श्रीमंत युवराज मालोजीराजे, प्रविणसिंह घाटगे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभाग प्रमुख पी. टी. गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते.