ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय खेळाडू रोहित शर्मा, रिषभ पंत, शुबमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांच्यासह विराट कोहली आणि हार्दिक पंड्यावरही बायो प्रोटोकॉल तोडल्याचे आरोप लावण्यात आले होते. ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी एक फोटो शेअर करत दावा केला होता की, कोहली आणि पंड्या वनडे मालिकेदरम्यान सिडनीतील एका दुकानात गेले होते. आता त्या दुकानाच्या मालकाने हा दावा खोटा असल्याचे सांगत, ऑस्ट्रेलियन माध्यमांवर भ्रामक वृत्ते पसरवण्याचा आरोप केला आहे.
सिडनीतील बेबी व्हिलेजमधील एका बेबी स्टोरमध्ये कोहली आणि पंड्या फिरायला गेले असताना त्यांनी बायो प्रोटोकॉल तोडल्याचे आरोप ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी केले होते. मात्र त्यांनी शेअर केलेला फोटो त्यावेळचा आहे, जेव्हा सिडनीध्ये कसल्याही प्रकारची बंदी नव्हती.
कोहली-पंड्याच्या भेटीवेळी सिडनीत कशावरही बंदी नव्हती
याविषयी बोलताना बेबी व्हिलेजचे मालक नाथन पोंग्रास म्हणाले की, “कोहली आणि पंड्या आमच्या दुकानात आले आणि त्यांनी काही वेळ घालवला. त्यावेळी सिडनीमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण नसल्याने कसलेही प्रतिबंध नव्हते. आमच्या दुकानात आल्यामुळे आम्हाला त्यांना भेटवस्तू द्यायची होती. परंतु त्यांनी आमचे काहीही ऐकले नाही आणि सर्व सामान पैसे देऊन खरेदी केले. त्यांनी आमच्यासोबत खूप चांगले वर्तन केले. आमच्या सहयोगी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते दोघेही खूप चांगले आहेत.”
अभिमान व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर शेअर केला होता फोटो
“कोहली आणि पंड्या यांनी आमच्या कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढले. त्यांनी खरेदीसाठी आमच्या दुकानाची निवड केली, हे गर्वाने सर्वांना सांगता यावे, यासाठी आम्ही ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले. असे असले तरी, आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांना हात लावण्याची परवानगी देण्यात आली नव्हती,” असे नाथन यांनी सांगितले.
https://www.instagram.com/p/CIfeCEhniVN/
सिडनीत ५० पैकी एखादी व्यक्ती मास्क घालते
ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी कोहली आणि पंड्या यांच्यावर मास्क न घालता बाहेर फिरल्याचा आरोप केला होता. याविषयी बोलताना नाथन म्हणाले की, “आमच्या दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या कोहली आणि पंड्याने मास्क घातले नव्हते. मी आधीच स्पष्ट केले आहे की, त्यावेळी सिडनीत कोरोनाचे रुग्ण नव्हते. त्यामुळे त्यावेळी सिडनीत ५० पैकी एखादा व्यक्ती मास्कचा वापर करत असे. मी तर फक्त वयस्कर व्यक्तींना सिडनीत मास्क घालून फिरताना पाहिले होते. गरोदर स्त्रियादेखील मास्क न घालता सिडनीच्या परिसरात वावरत असतात.”
ऑस्ट्रेलियन माध्यमांची वृत्ते लाजिरवाणी
शेवटी बोलताना नाथन म्हणाले की, “ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी अपुष्ट अहवालांच्या मदतीने कोहली आणि पंड्यावर खोटे आरोप लावले. त्यांचे हे कृत्य अतिशय लाजिरवाणे होते. ऑस्ट्रेलियन माध्यमांतील वृत्तांनुसार, ३ जानेवारीनंतर न्यू साउथ वेल्समध्ये गेमिंग रुम, हेयर सलून आणि इतर दुकानात मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. खरे तर, १५ डिसेंबरपासून येथे कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली होती.”
वीस दिवसांनंतर उघडले ऑस्ट्रेलियातील माध्यमांचे डोळे
ऑस्ट्रेलियातील सिडनी मॉर्निंग हेराल्ड वृत्तपत्राने कोहली आणि पंड्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर बायो प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे आरोप केल होते. परंतु २० दिवसांनंतर त्यांचे डोळे उघडले. कारण त्यांनी ज्यावेळचा फोटो शेअर करत कोहली व पंड्यावर आरोप लावले होते, त्याच्या २० दिवसांपुर्वीच ते दोघेही भारतात परतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत करणार ओपनिंग, मग कुणाला मिळेल डच्चू ?
कुठे व केव्हा होणार भारत-ऑस्ट्रलिया तिसरा कसोटी सामना, जाणून घ्या सर्वकाही
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले