ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे होणार आहे. या सामन्याला गुरुवार(७ जानेवारी) पासून सुरुवात होईल. या सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आसन क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडची एकूण आसनक्षमता ३८००० असून आता तिसऱ्या कसोटीसाठी अंदाजे ९५०० प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. हा निर्णय न्यू साऊथ वेल्स सरकारच्या सल्ल्याने घेण्यात आला आहे.
खरंतर सिडनीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने इथे तिसरा कसोटी सामना होईल की नाही यावर शंका होती. मात्र काही दिवसांपूर्वीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले की हा सामना सिडनी येथेच होईल.
प्रेक्षकांमध्ये सोशल डिस्टसिंग
याबरोबरच सिडनी कसोटीसाठी प्रेक्षकांना जरी उपस्थित राहण्याची परवानगी दिली असली तरी यासाठी काही सोशल डिस्टंसिंगसाठीही योजना बनवाव्या लागणार आहेत.
सोमवारपासून पुन्हा तिकीटविक्री
या सामन्यासाठी ज्यांनी आधी तिकीटे घेतली होती, त्यांना त्यांच्या तिकीटाचे पूर्ण पैसे परत करण्यात येणार असून सोमवारी(४ जानेवारी) दुपारपासून पुन्ह नव्याने तिकीटविक्री सुरु होणार आहे.
मालिकेत बरोबरी –
ऑस्ट्रेलियाने या कसोटी मालिकेतील पहिला सामना ८ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर भारतीय संघाने मेलबर्न येथे जोरदार पुनरागमन करत दुसरा कसोटी सामना ८ विकेट्सने जिंकला. याबरोबरच मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत भक्कम आघाडी घेण्याची दोन्ही संघांना संधी आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल होणार आहेत. ऑस्ट्रेलियन संघात डेविड वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की या सलामीवीरांचे पुनरागमन झाले आहे. तर भारतीय संघात रोहित शर्मा परतला आहे. याबरोबरच उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागेवर टी नटराजनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी! रोहित, पंतसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह
शुभमंगल सावधान! अर्जूनवीर कुस्तीपटू राहुल आवारे अडकला लग्नबंधनात
ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर; भारताविरुद्ध २० विकेट्स घेणारा ‘हा’ गोलंदाज सिडनी कसोटीतून बाहेर