इंदोर येथे सध्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आज (22 फेब्रुवारी) दुसऱ्या दिवशी झारखंड विरुद्ध जम्मू काश्मिर संघात सामना पार पडला. या सामन्यात झारखंडने 9 विकेट्सने विजय मिळवला. झारखंडच्या या विजयात कर्णधार इशान किशनने केलेली शतकी खेळी महत्त्वाची ठरली.
याबरोबरच त्याने मोठा विक्रमही केला आहे. तो कर्णधार-यष्टीरक्षक म्हणून ट्वेंटी20 क्रिकेट प्रकारात शतक करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने या सामन्यात झारखंडचे नेतृत्व तसेच यष्टीरक्षणही केले आहे.
याआधी दिनेश कार्तिक हा कर्णधार-यष्टीरक्षक म्हणून सर्वोच्च धावा करणारा भारतीय फलंदाज होता. त्याने 2010 मध्ये तमिळनाडूचा कर्णधार-यष्टीरक्षक म्हणून आंध्रप्रदेश विरुद्ध 90 धावांची खेळी केली होती.
आजच्या सामन्यात जम्मू-काश्मिरने झारखंडला विजयासाठी 20 षटकात 169 धावा करण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या इशानने 55 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 100 धावा केल्या. तसेच त्याने आनंद सिंग बरोबर सलामीला 104 धावांची भक्कम भागीदारीही रचली.
आनंद 48 धावांवर बाद झाल्यावर विराट सिंगसह इशानने 66 धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी करत झारखंडला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला.
ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये कर्णधार-यष्टीरक्षक म्हणून शतक करणारा इशान जगातील एकूण 5 वा खेळाडू आहे. याआधी मोइन खान, ऍडम गिलख्रिस्ट, कमरान अकमल आणि उपुल थरंगा यांनी हा पराक्रम केला आहे. तसेच गिलख्रिस्टने असा पराक्रम दोन वेळा केला आहे.
यावर्षीच्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये आत्तापर्यंत 5 जणांनी शतके केली आहेत. यात चेतेश्वर पुजारा(100*), श्रेयस अय्यर(147), अभिमन्यू ईश्वरन(107*), रिकी भूई(108*) आणि इशान(100*) यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–तब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच
–युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी
–आयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट