ब्रिस्बेन। भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्यातून भारताकडून टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. टी नटराजन भारताकडून कसोटी पदार्पण करणारा ३०० वा तर सुंदर ३०१ वा खेळाडू ठरला.
भारताकडून १०० आणि २०० क्रमांकाची कसोटी कॅप मिळवणारे खेळाडू –
नटराजनला भारताकडून कसोटी पदार्पणाची ३०० क्रमांकाची कॅप मिळाली. म्हणजेच भारताकडून आता गेल्या ८९ वर्षात कमीतकमी ३०१ खेळाडू किमान एकतरी कसोटी सामना खेळले आहेत. भारताला कसोटीत पदार्पण करणारा १०० वा खेळाडू १९६१ साली मिळाला होता. त्यावेळी बाळू गुप्ते यांनी पाकिस्तानविरुद्ध चेन्नई येथे कसोटी पदार्पण केले होते. ते भारताकडून कसोटी पदार्पण करणारे १०० वे खेळाडू ठरले होते.
त्यानंतर ३३ वर्षांनी सन १९९४ ला नयन मोंगियाने जेव्हा श्रीलंकेविरुद्ध लखनऊ येथे कसोटी पदार्पण केले, तेव्हा भारताला २०० वा कसोटीपटू मिळाला. त्यानंतर आता सन २०२१ मध्ये भारताला ३०० वा कसोटीपटू टी नटराजनच्या रुपात मिळाला आहे.
The stuff dreams are made of. A perfect treble for @Natarajan_91 as he is presented with #TeamIndia's Test 🧢 No. 300. It can't get any better! Natu is now an all-format player. #AUSvIND pic.twitter.com/cLYVBMGfFM
— BCCI (@BCCI) January 14, 2021
या खेळाडूंची विकेट नटराजनसाठी अविस्मरणीय –
नटराजनने ब्रिस्बेन कसोटीत गोलंदाजी करताना मॅथ्यू वेडला आपल्या गोलंदाजीवर डावाच्या ६४ व्या षटकात झेलबाद केले. त्याचा झेल शार्दुल ठाकूरने घेतला आणि नटराजनला त्याची पहिली कसोटी विकेट मिळाली. याआधी नटराजनने याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने कॅनबेरा येथे २ डिसेंबर २०२० ला वनडे पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात मार्नस लॅब्यूशेनला बाद केले होते. त्यामुळे लॅब्यूशेन त्याची पहिली वनडे विकेट ठरला. तर त्यानंतर दोनच दिवसांनी ४ डिसेंबरला नटराजनने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण केले. पदार्पणतच त्याने ग्लेन मॅक्सवेलला बाद करत पहिली आंतरराष्ट्रीय टी२० विकेटही मिळवली.
विशेष म्हणजे लॅब्यूशेनला त्याने कसोटी पदार्पणाच्या सामन्यातही वेडनंतर बाद केले. त्यामुळे लॅब्यूशेन त्याची दुसरी कसोटी विकेट ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
पदार्पण करताच टी नटराजनच्या नावावर झाले कोणत्याच भारतीय क्रिकेटपटूला करता न आलेले ३ मोठे रेकॉर्ड
‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरची कमाल! पहिल्याच चेंडूवर विकेट घेत केला ‘हा’ मोठा विक्रम
रोहितने घेतला स्मिथचा ‘सुंदर’ झेल आणि वॉशिंग्टनला मिळाली पहिली कसोटी विकेट, पाहा व्हिडिओ